गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी परवापर्यंत जाहीर होण्याची शक्यता काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली. ही यादी किती उमेदवारांची असेल ते सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज बुधवारी नवी दिल्लीत होणार असून त्यात पहिली यादी निश्चित करण्यात येणार असल्याचे चोडणकर म्हणाले. कॉंग्रेस पक्षातून फुटून गेलेल्या एकाही आमदाराला कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एल्विस गोम्स हे पक्षातील एक मोठे नेते असून त्यांना राज्यातील कुठल्याही एका मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळू शकते असे त्यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले.