उपसभापती विष्णू वाघ यांना अत्यवस्थ स्थितीत मुंबईला हलवल

0
137

गेले तीन दिवस बांबोळी इस्पितळात मृत्यूशी झुंज देत असलेले उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांना काल संध्याकाळी उशीरा हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईतील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले. वाघ यांच्याबरोबर तीन वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर मुंबईला रवाना झाले आहेत. वाघ यांना मुंबईला हलविणार असल्याचे वृत्त मिळताच अनेक राजकारणी व वाघ यांच्या निकटवर्तीयांनी बांबोळीला गर्दी केली होती.

गोमेकॉच्या परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. वाघ यांना मुंबईला हलविण्याच्या तयारीसाठी काल सकाळपासूनच सरकारी यंत्रणा सज्ज झाली होती. डॉक्टर व सरकारी अधिकारी यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. भाजप पक्ष पातळीवरही बैठका झाल्या व त्यानंतरच वाघ यांना हिंदुजा इस्पितळात हलविण्याचा निर्णय झाला. तीन दिवसांपूर्वी गोवा कला अकादमीत भजन स्पर्धेच्या कार्यक्रमास ते गेले असता तेथेच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना ताबडतोब बांबोळी इस्पितळात दाखल केले होते. एका महिन्यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकर्ते अनिल होबळे यांच्या सत्कार सोहळ्याच्यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यातून सावरल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. काल दिवसभरात मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दोन वेळा बांबोळीला भेट
दिली.
परमेश्‍वराकडे प्रार्थना करा – तेंडुलकर
सांतआंद्रेचे आमदार तथा उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांच्यावर सध्या बांबोळी इस्पितळात उपचार चालू आहेत. सरकार व पक्ष त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी जनतेने परमेश्‍वराकडे प्रार्थना करावी, असे आवाहन प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केले.
काल सकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अन्य मंत्री, आरोग्य अधिकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व प्रमुख डॉक्टरांची बांबोळी येथे बैठक होऊन त्यांना उपचारासाठी येथून हलविण्यावर विचार झाला. वाघ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी काहीही कमी पडू न देण्याचे पक्षानेही ठरविले आहे, असेही तेंडुलकर यांनी
सांगितले.