उन्हाच्या तीव्र झळांनी पणजीवासीय होरपळले

0
11

>> राजधानीत विक्रमी 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; येत्या काही दिवसात तापमानात चढ-उतार राहणार

राज्यातील पणजी शहरात सोमवार 13 फेब्रुवारी रोजी विक्रमी 37.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 5.5 अंश सेल्सिअस एवढे जास्त होते. तापमानात अचानक वाढ झाल्याने दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. तसेच उकाड्याचाही त्रास सहन करावा लागला.

येथील हवामान विभागाने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार काल पणजीत तापमानात वाढ पाहायला मिळाली. दिवसभरात कमाल 37.9 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले. तसेच किमान 21.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे सामान्य तापमानापेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने जास्त होते. कडाक्याच्या उन्हामुळे दिवसभरात अंगाची अक्षरश: काहीली झाली.
येत्या दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसमध्ये घट होण्याची शक्यता आहे. तसेच, 16 आणि 17 फेब्रुवारीला 2 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला मुरगावमध्ये काल दिवसभरात 34.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे सामान्य तापमानापेक्षा 2.7 अंश सेल्सिअसने जास्त होते. पणजी येथे 7 एप्रिल 1989 रोजी आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस अशा कमाल तापमानाची नोंद झाली होती. येथील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 1969 ते 2023 पर्यंत फक्त फेब्रुवारी महिन्यात आठ दिवस 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त कमाल तापमान नोंद झाले आहे. पणजी शहरात 21 फेब्रुवारी 2009 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले होते. त्यानंतर 29 फेब्रुवारी 1984 रोजी 38 अंश सेल्सिअस, 20 फेब्रुवारी 1999 रोजी 37.7 अंश सेल्सिअस, 9 फेब्रुवारी 2001 रोजी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

दिवसा चटके; रात्री गारेगार
राज्यात अजूनही काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. रात्रीच्या वेळेस उत्तरोत्तर थंडीत वाढ होत जाते, तर दुसऱ्या बाजूला दिवसा सूर्य तळपू लागल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. परिणामी दिवसा चटके आणि रात्री गारेगार अशी स्थिती आहे.