>> ऑगस्टपर्यंत रात्रीची संचारबंदी
टाळेबंदी ः(तीन दिवस) शुक्रवार दि. १७ ते रविवार दि. १९ जुलैपर्यंत.
संचारबंदी ः दि. १५ जुलै ते दि. १० ऑगस्ट (वेळ ः रात्री ८ ते सकाळी ६)
वगळले ःरात्रपाळीचे कामगार व वैद्यकीय सेवा देणारे लोक.
राज्यातील कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन काल झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत उद्या शुक्रवार दि. १७ ते रविवार दि. १९ जुलै असे तीन दिवस राज्यात पूर्ण टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बुधवार दि. १५ जुलैपासून ते १० ऑगस्टपर्यंत म्हणजेच २५ दिवस राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता १० ऑगस्टपर्यंत राज्यात रात्रौ ८ ते सकाळी ६ या दरम्यान कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. मात्र, रात्रपाळीचे कर्मचारी तसेच वैद्यकीय सेवा देणारे लोक यांना या संचारबंदीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर काल पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सध्या पावसाचा जोर खूपच वाढलेला आहे आणि त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग गेले काही दिवस वाढलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने धोका पत्करण्याऐवजी हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलावीत असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे होते. त्यांची सूचना लक्षात घेऊन आम्ही तीन दिवसांची टाळेबंदी व २५ दिवसांची रात्रीची संचारबंदी लागू करणे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
टाळेबंदी उद्या शुक्रवारपासून सुरू होणार असली तरी गुरुवारपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार असल्याने एका अर्थाने गुरुवार दि. १५ रोजी रात्रौ ८ वाजल्यापासूनच लॉकडाऊन सुरू होणार आहे.
गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कुणीही घराबाहेर पडू नये. तसेच रात्री ८ ते सकाळी ६ या दरम्यानच्या संचारबंदीचे सर्वांनी काटेकोरपणे १० ऑगस्टपर्यंत पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
अनलॉकमध्ये बेशिस्त वाढली
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही लोक खूपच बेशिस्तीने वागू लागले आहेत. बाहेर पडताना तसेच वर्दळीच्या ठिकाणी मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे, रात्रीच्या पार्ट्या करणे आदी प्रकार होऊ लागले. लोकांनी अशाप्रकारे बेशिस्तीने वागू नये यासाठी जनजागृतीचे कामही सरकार हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
रुग्णवाढीचा आलेख
खाली येण्याची गरज
लोक निष्काळजीपणे वागू लागल्याने स्थिती हाताबाहेर जाऊ लागली. त्यामुळे सरकारला तीन दिवसांची टाळेबंदी व रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. या घडीलाही राज्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही एका हजारांवर असून राज्यातील रुग्णवाढीचा हा आलेख खाली यायला हवा, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
चाचण्यांच्या बाबतीत
गोवा राज्य आघाडीवर
कोरोनासाठीच्या चाचण्यांच्या बाबतीत गोवा राज्य देशात आघाडीवर असल्याचे सांगून संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी ‘कोविड केअर सेंटर्स’ची संख्या अजून वाढवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मृतांचे प्रमाण कमी
राज्यात कोविड-१९ मृतांचे प्रमाणे कमी असून ते ०.६५ एवढे आहे. मृतांपैकी केवळ एक रुग्ण सोडल्यास अन्य सर्व रुग्णांना कोणते ना कोणते गंभीर स्वरुपाचे असे आजार होते. एक-दोघांना कर्करोग होता. त्यापैकी एकाला तर तिसर्या टप्प्यातील कर्करोग होता. एक रुग्ण यकृत खराब झालेला होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. आमोणकरांचे निधन कोरोनामुळे नव्हे ः मुख्यमंत्री
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे निधन होण्याच्या एका दिवसापूर्वी त्यांची जी कोरोनासाठी चाचणी केली होती त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड-१९ ने झालेल्या मृत्यूंच्या यादीतून डॉ. आमोणकर यांचे नावे गाळायचे की काय याबाबत आता आरोग्यखातेच काय तो निर्णय घेणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. डॉ. आमोणकर यांची ५ जुलै रोजी कोविडसाठीची चाचणी घेण्यात आली होती. दि. ६ रोजी त्यांचे निधन झाले. दि. ६ रोजी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसमध्ये त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह म्हटले होते. डॉ. आमोणकर यांना मूत्रपिंड विकार, हृदयरोग व मधुमेह होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामुळे आता आरोग्य खातेच निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.