पणजी शहरात काढणार निषेध रॅली
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) आणि त्यांच्या सहयोगी कामगार संघटना येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असून यानिमित्त पणजी शहरात निषेध रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती आयटक या कामगार संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी पणजीत एक सामूहिक रॅली काढण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पणजी कदंब बसस्थानकाजवळून निषेध रॅलीला सुरूवात होणार आहे. या निषेध रॅलीची सांगता आझाद मैदानावर होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चार कामगार संहितेच्या अंमलबजावणीच्या निषेधार्थ हा संप आणि रॅली आयोजित करण्यात येत आहे. नवीन कामगार संहिता कष्टाने मिळवलेल्या कामगारांच्या हक्कांना कमकुवत करीत आहे. संप करण्याचा अधिकार मर्यादित करते, कंत्राटीकरणाला प्रोत्साहन देते आणि नोकरी सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाला कमकुवत करीत आहे, असा आरोप ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला.