उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात काल झालेल्या एका भीषण दुर्घटनेत बस २०० मीटर खोल दरीत कोसळून ४८ जण मरण पावले असून अन्य ११ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५८ प्रवासी होते अशी माहिती पोलीस अधीक्षक जगत राम जोशी यांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राज्यपाल के. के. पॉल व मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दुर्घटनेच्या दंडाधिकार्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
दुर्घटना घडल्यानंतर ५८ पैकी ४५ प्रवासी जागीच ठार झाले व १३ जण जखमी झाले. जखमींना इस्पितळात नेल्यानंतर उपचारांदरम्यान त्यातील दोघेजण मरण पावले. उर्वरीत ११ पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे जोशी यांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी बसमध्ये क्षमतेहून अधिक प्रवासी होते असे ते म्हणाले. दुर्घटनास्थळावरून सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या निकटवर्तियांना प्रत्येकी २ लाख रुपये सानुग्रह मदत राज्य प्रशासनाने जाहीर केली आहे.