उघड्यावर स्वयंपाक केल्यास पर्यटकांना 50 हजारांचा दंड

0
12

पर्यटकांनी उघड्यावर स्वयंपाक केल्यास त्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे, असा इशारा गोवा पर्यटन खात्याने काल दिला.
राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने पर्यटकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. गोवा पर्यटन विकास मंडळाच्या बैठकीत या सूचनांवर विचारविनिमय करून त्यांना मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पर्यटनामध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात पर्यटकांकडून समुद्रकिनारे व इतर ठिकाणी गैरप्रकार केले जात असल्याचे आढळून येत आहे.

समुद्र किनाऱ्यांसारख्या खुल्या भागात मद्यपान करणे, उघड्यावर स्वयंपाक करणे, भीक मागणे, पर्यटनस्थळी कचरा फेकणे, समुद्रकिनाऱ्यांवर वाहन चालवणे, ड्रग्स तस्करांना प्रोत्साहन देणे, अमलीपदार्थांचे सेवन करणे कायद्यानुसार कठोरपणे प्रतिबंधित आणि दंडनीय आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.
पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेल्या हॉटेल, व्हिला व इतर निवासी आस्थापनांमध्येच पर्यटकांनी निवासासाठी बुकिंग करण्याची सूचना करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रातील दलालांपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.