अंजदीव बेटावरील प्रार्थनास्थळांवर प्रार्थना करू देण्याच्या मागणीने वाद

0
13

नौदलाच्या ताब्यात असलेल्या अंजदीव बेटावरील प्रार्थनास्थळांवर प्रार्थना करू देण्याच्या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे. ‘गोंयचे फुडले पिलगे खातीर’ या संस्थेने नौदलाच्या ताब्यात असलेल्या अंजदीव बेटावरील प्रार्थना स्थळांवर 2 फेब्रुवारी आणि 4 ऑक्टोबर या दिवशी प्रार्थना करू देण्याच्या मागणीसाठी गोव्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, मुख्य सचिव आणि महसूल सचिव यांना एक निवेदन सादर केले आहे.

गोवा सरकारच्या महसूल विभागाने 1979 पासून गोव्याच्या अधिकार क्षेत्रातील अंजदीव बेट नौदलाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर महसूल विभागाने 1989 मध्ये अंजदीव बेट भारतीय नौदलाकडे सोपवण्याची औपचारिकता पूर्ण केली. राज्यातील विशेषत: काणकोण तालुक्यातील लोकांना 2 फेब्रुवारी रोजी अवर लेडी ऑफ स्प्रिंग्स आणि 4 ऑक्टोबर रोजी सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या फेस्तासाठी वर्षातून दोनदा प्रवेश करण्याचा परंपरेनुसार सदर बेटावर प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. अंजदीव बेट नौदलाकडे सुपूर्द करण्यात आल्याने 2003 सालापासून भाविकांना बेटावर प्रार्थना करण्यापासून भारतीय नौदलाने रोखले आहे.

फेस्त उत्सवासाठी वर्षातून दोनदा बेटावर प्रार्थनेची प्रथा असल्याने भाविकांना प्रचंड त्रास होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. महसूल खात्याला या अंजदीव बेटावर नागरिकांकडून वर्षातून दोन वेळा परंपरेनुसार प्रार्थना केली जात असल्याची पूर्ण माहिती होती, तरीही भारतीय नौदलाकडून प्रार्थनेचा अधिकार हिरावून घेण्यात आला. राज्यपाल, मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून 2 फेब्रुवारीला अंजदीव बेटावर फेस्त साजरे करण्यासाठी भाविकांना परवानगी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.