>> रेती माफियांना अटक न झाल्याने कृती
उगवे भागात होणार्या बेसुमार रेती उत्खननाला विरोध करणार्या प्रभाकर महाले यांना मारहाण करणार्या रेती माफियांना अटक करण्यासाठी त्याच दिवशी आंदोलन करूनही कारवाई न झाल्याने काल (रविवारी) संतप्त उगवेवासियांनी मोठ्या संख्येने जमून पेडणे पोलीस स्टेशनवर धडक दिली. व कारवाईची मागणी केली. नंतर पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून जमावाला शांत केले. तसेच संशयितांना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच आपण पेडणे तालुक्यातील पूर्ण बेकायदा रेती उत्खनन बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.
चोडणकर यांनी उगवे ग्रामस्थांना सामोरे जाऊन प्रभाकर महाले यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद केल्याचे सांगून संशयितांना अटक करण्याचे आश्वासन दिले. काल तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने पोलिस यंत्रणा त्यात गुंतल्याची माहिती त्यानी दिली.
उगवेवासिय पोलीस स्टेशनवर मोर्चा आणणार याची कुणकुण लागल्याने रजेवरील पोलिसांनाही बोलावून पोलीस स्थानकावर मोठा फौजफाटा तैनात केला होता.
ग्रामस्थांनी त्याआधी या प्रकरणी काल बैठक घेऊन पुढील कृतीबाबत चर्चा केली. यावेळी संतोष महाले यांनी सांगितले की उगवे खाडीत गेल्या दहा वर्षांपासून बेकायदा रेती उपसा चालू आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंदावून किनार्यावरील बागायतीतील माडांसह हजारो झाडे वाहून गेली आहेत. सरकार याप्रकरणी कारवाई करत नसल्याने हा लढा व्यापक बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. रेती माफियांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.