ईशा मंत्री मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी

0
194

उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे साकडे
इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवाला आलेल्या ईशा मंत्री या युवतीच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठापुढे एका प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी तपासकाम करणार्‍या पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे आपण प्रतिज्ञापत्रातून खंडपीठाच्या नजरेत आणून दिले असल्याचेही ते म्हणाले.सनबर्न व सुपरसोनिक या दोन्ही नृत्य महोत्सवापूर्वीच आपण खंडपीठात एक जनहित याचिका सादर केली होती व वरील महोत्सवात अमली पदार्थांचा वापर होणार नाही याकडे लक्ष पुरवण्याचा आदेश सरकारला द्यावा अशी मागणी याचिकेतून खंडपीठाकडे केली होती.
या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर होतो अशी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फाईलीत केलेल्या टिप्पणी संदर्भात आपण न्यायालयीन चौकशीची मागणीही या जनहित याचिकेतून केली होती. ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली असता या महोत्सवासाठी घालून दिलेली सगळी मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यात येतील व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात येईल असे निवेदन ऍडव्होकेट जनरलनी कोर्टापुढे केले होते. मात्र, तसे असतानाही सुपर सॉनिकने आयोजित केलेल्या महोत्सवात ईशा मंत्री या २७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. महोत्सव स्थळीच कोसळून तिचे निधन झाले ही बाब आपण प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठासमोर ठेवल्याचे डिमेलो म्हणाले. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे व डान्स महोत्सवात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करू दिल्यामुळेच वरील प्रकरण घडल्याचे आपण खंडपीठाच्या नजरेत आणून दिल्याचे डिमेलो म्हणाले. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी आपण प्रतिज्ञापत्रातून केली असल्याचे त्यानी शेवटी सांगितले.