इस्लामिक दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करणार : ओबामा

0
193

सिरीया, इराकमध्ये लष्करी कारवाई वाढवण्याचे संकेत
सिरीया आणि इराकमध्ये धुमाकूळ सुरू असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवादी संघटनेला नामोहरम करून संपवून टाकण्याचा प्रण घेतल्याचे काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. येत्या दिवसात दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सिरीयात अमेरिकी हवाई हल्ले वाढविण्यात येणार असल्याची तसेच इराकच्या मदतीला ४७५ लष्करी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.
सिरीया व इराकमधील भूभाग दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ओबामा यांनी काल दूरचित्रवाणीवरील संदेशात सांगितले. इस्लामिक स्टेट संघटनेच्या विरोधात मोहिमेचे नेतृत्व अमेरिका करणार असून यात एकुण १२ देश वेगवेगळ्या तर्‍हेने सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली. केवळ अमेरिकी नागरिकांच्याच बचावासाठी नव्हे तर एकुणच मानवी हिताच्यादृष्टीने ही कारवाई असेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दहशतवाद्यांनी सिरीया व इराकमध्ये पादाक्रांत केलेला प्रदेश हा ब्रिटनच्या क्षेत्रफळाएवढा आहे. हल्लीच इस्लामिक दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दोन पत्रकारांचा शिरच्छेद केला होता.