इस्रायलविरोधातील निदर्शकांवर गोळीबार : एक ठार

0
239

कुलगाम जिल्ह्याच्या कैमी शहरात काल गाझा पट्टीतील इस्रायली हल्ल्यांविरोधात निदर्शने करणार्‍यांवर झालेल्या गोळीबारात एक युवक ठार झाला. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
ठार झालेल्या युवकाचे नाव सुहेल अहमद मीर असे असून तो कुलगाममधील मिश्रीपोरा येथील असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण बनले असल्याचे वृत्त आहे. युवक ठार झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर नजीकच्या भागांमध्येही निदर्शने सुरू झाली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीतील इस्रायली सैन्याच्या हल्ल्यांविरोधात कैमो भागात युवक निदर्शने करीत होते. त्या निदर्शकांवर तेथे तैनात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी लाठीमार केल्याने निदर्शने हिंसक बनली. युवकांनी जवानांवर जोरदार दगडफेक सुरू केली. त्यामुळे जवानांनी केलेल्या गोळीबारात एक युवक ठार झाला. तर अन्य काही जखमी झाल्याचे सांगण्यात आले.