Home बातम्या इराणने पाडले अमेरिकेचे लढाऊ विमान

इराणने पाडले अमेरिकेचे लढाऊ विमान

0

देशाच्या मध्यवर्ती भागात काल अमेरिकेचे दुसरे एफ-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा काल इराणने केला. पाडण्यात आलेल्या विमानातील वैमानिक बचावल्याची शक्यता कमी आहे. मात्र या विमानाच्या पायलटला पकडल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे.

मध्य पूर्वेत युद्ध सुरु होऊन महिना उलटला आहे. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष सुरू आहे. आयआरजीसीच्या नवीन एअरोस्पेस फोर्स एअर डिफेन्स सिस्टमने अमेरिकेचे पाचव्या पिढीच्या दुसऱ्या एफ-35 विमानाला लक्ष्य केले आणि ते मध्य इराणमध्ये पाडण्यात आले.
इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यावर अमेरिकेची अनेक हेलिकॉप्टर्स इराणच्या आकाशात घिरट्या घालत होती. वैमानिकाच्या सुटकेसाठी अमेरिकेची हेलिकॉप्टर्स आली होती. त्यातील एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा इराणने केला आहे.

इराणने शुक्रवारी इस्रायल आणि काही आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागली, तर दुसरीकडे इराणमधील तेहरान आणि इस्फहान शहरात स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले. इराणच्या ड्रोन्सनी शुक्रवारी कुवेतच्या मिना अल-अहमदी ऑइल रिफायनरीला लक्ष्य केले, ज्यामुळे रिफायनरीत आग लागल्याचे समोर आले.

अमेरिकेच्या हल्ल्यात 8 ठार; 95 जखमी
अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानला पश्चिमेकडील कराज शहराशी जोडणाऱ्या एका महामार्गावरील एका मोठ्या पुलावर काल भीषण हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ ट्रम्प यांनी शेअर केला आहे. या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 95 जण जखमी झाले.