>> चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पणजीत विविध ठिकाणी सजावटीचे काम सुरू
पणजीत २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. हा महोत्सव केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राजधानी पणजीत विविध ठिकाणी सजावटीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच मयुर आकारातील विविध प्रतिकृती देखील लक्ष वेधून घेत आहेत.
लोकप्रिय फ्रेंच चित्रपटांच्या ८ स्क्रिनिंगसह फ्रान्स हा ‘फोकस कंट्री’ असेल. ऑस्ट्रियन चित्रपट अल्मा आणि ऑस्कर या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होईल, तर पोलिश चित्रपट परफेक्ट नंबर हा शेवटचा चित्रपट असेल. जर्मन चित्रपट फिक्सेशन मिड-फेस्ट चित्रपटाचा भाग असेल. या महोत्सवात स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक कार्लोस सौरा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या महोत्सवात तज्ञांचे मास्टर क्लासेस आणि ५३ तासांची फिल्म चॅलेंज स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. देशभरातील अर्जांमधून निवडलेल्या उद्याच्या ७५ सर्जनशील विचारवंतांनाही महोत्सवात गौरविण्यात येणार आहे. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी विशेष मास्टरक्लासचीही व्यवस्था करण्यात आली आहे. युनिसेफच्या सहकार्याने इफ्फीमध्ये माहितीपट आधारित चित्रपटही दाखवले जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी अभिनय आणि चित्रपट निर्मिती या विषयावरील कार्यशाळा ही यावर्षीच्या इफ्फीसाठी नियोजित आणखी एक विशेष उपक्रम आहे.
दरम्यान, उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्यांनी १९ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत इफ्फीशी संबंधित सर्व ठिकाणांभोवती जमावबंदीचे कलम लागू केले आहे.
गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडणार
इफ्फीमध्ये गोमंतकीय कला व संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. २६ आणि २७ नोव्हेंबरला संध्याकाळी ३ ते ४.३० यावेळेत मनोरंजन संस्थेजवळच्या परिसरात शिगमोत्सव आणि कार्निव्हलचे आयोजन केले जाणार आहे.