केंद्रीय माहिती प्रसारण मंत्र्यांची घोषणा : करारावर स्वाक्षरी
गोवा हे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठीचे कायम स्वरुपी स्थळ ठरवण्यासाठीच्या समझोता करारावर काल गोव्याचे मुख्य सचिव बी. विजयन् व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सह्या केल्या. गोवा हे यापूर्वीही इफ्फीसाठीचे कायम स्थळ होते. पण तो दर्जा हंगामी स्वरुपाचा होता. त्यामुळे त्यासाठीच्या करारावर दरवर्षी सह्या कराव्या लागत होत्या. आता दरवर्षी समझोता करार करून त्यावर सह्या कराव्या लागणार नसल्याचे जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे मंत्री मिलिंद नाईक, गोवा करमणूक सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक व अन्य अधिकारी यावेळी हजर होते.
इफ्फी ‘कान’ व ‘टोरांटो’ या चित्रपट महोत्सवाच्या तोडीचा व्हावा यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करण्यात येतील. आता इफ्फीसाठी केवळ ६३ दिवस बाकी राहिले असून यंदाच्या महोत्सवात कोणत्याही उणीवा राहू नयेत यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अथकपणे काम करीत असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय चित्रपट निवडण्यासाठीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. चित्रपट निवडण्यासाठी तज्ज्ञ लोकांचे मदत घेण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवात काही चांगले बदल करण्यात येणार असून त्यासाठी संकल्पना तयार करण्याचे कामही सुरू आहे. करमणुकीबरोबरच या महोत्सवातून मालमत्ता व ज्ञान निर्मिती व्हावी हा उद्दिष्ट्यही ठेवण्यात आले असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
१० देशांबरोबर सहनिर्मिती करार
आतापर्यंत ५ देशांबरोबर सहचित्रपटनिर्मिती करार करण्यात आलेले असून उद्या चीनबरोबरही त्यासाठीचा करार करण्यात येणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. या सर्व दहाही देशांच्या प्रतिनिधींना इफ्फीसाठीचे आमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यानी यावेळी दिली. दरवर्षी प्रमाणेच यंदावी इफ्फीत मास्टर क्लासेस, ओपन फोरम, चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
कोकणी – मराठी चित्रपटांचा खास विभाग
यंदा इफ्फीत कोकणी व मराठी या चित्रपटांसाठी एकत्रित एक वेगळा विभाग असेल असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ईशान्येकडील चित्रपटांसाठीही एक स्वतंत्र विभाग असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्याची मातृभाषा असलेल्या कोकणीतून बनणार्या चित्रपटाना इफ्फीत योग्य स्थान मिळावे यासाठी हा स्वतंत्र विभाग आहे. तसेच महाराष्ट्राबरोबरच गोव्यातूनही मराठी चित्रपटांची निर्मिती होते आहे. त्यामुळे कोकणी विभागात मराठीलाही स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दुर्लक्ष होत असलेल्या ईशान्येकडील राज्यातही चांगले चित्रपट बनवले जात असून या चित्रपटांना चालना मिळावा यासाठी त्यांचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जावडेकर म्हणाले.
यंदा उद्घाटनाचा चित्रपट कला अकादमीत
यंदाचा इफ्फीचा उद्घाटन सोहळा व समारोप सोहळा दोनापावला येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर हॉलमध्ये होईल. मात्र, इफ्फीच्या उद्घाटनाच्या चित्रपटाचा खेळ मात्र पूर्वीप्रमाणेच कला अकादमीत होणार असल्याचे जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्घाटन समारंभ व समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी व अन्य अतिथी म्हणून कोणाला बोलवावे त्याचा निर्णय घेण्याचे तसेच जीवन गौरव पुरस्कार कोणाला द्यावा त्यााचा अभ्यास करण्याचे काम चालू असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
नवी सुकाणू समिती
इफ्फीसाठीच्या सुकाणू समितीवर नितीश भारद्वाज, जानू बरूआ, सुधीर मिश्रा, एल्. सुरेश, प्रल्हाद कक्कड, वाणी त्रिपाठी, रवी कोटकारा, शाजी करूण, ए. के. बीर, विक्रमादित्य मोटवानी, भरत बाला आदींची निवड करण्यात आली असल्याचेही यावेळी जावडेकर यांनी सांगितले.
२०१५ च्या ‘इफ्फी’साठी नव्या स्थळाचा विकास : पर्रीकर
२०१५ साली होणार असलेला इफ्फी सध्याच्या स्थळी होणार नसून त्यासाठी नव्याने सगळी साधनसुविधा उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. त्यासाठी जागेचा शोध चालू आहे. पणजी शहराच्या आसपास ही साधनसुविधा उभारण्यात येईल व २०१५ सालचा इफ्फी तेथे होईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
त्या ठिकाणी इफ्फीसाठी नवे मल्टिप्लेक्स उभारण्यात येईल. तसेच तेथे इफ्फी सचिवालय उभारण्यात येईल. इफ्फीसाठीच्या सर्व साधनसुविधा तेथे उभारण्यात येतील. तेथील मल्टिप्लेक्स इफ्फीच्या काळात इफ्फीसाठी वापरण्यात येईल. तर अन्य वेळी चित्रपटांचे खेळ आयोजित करण्यासाठी ते व्यावसायिकांना देण्यात येईल. नव्या साधनसुविधा उभारण्यासाठीचे काम येत्या जानेवारी महिन्यात हातात घेण्यात येणार असल्याची माहिती पर्रीकर यांनी यावेळी दिली. या इफ्फी स्थळी प्रतिनिधी सभागृह (कन्व्हेन्शन सेंटर), तसेच इफ्फीसाठीची अन्य साधनसुविधा उभारण्याबरोबरच तेथे एक ओशेनेरिएमही उभारण्यात येणार आहे. यंदाच्या इफ्फीपूर्वी आयनॉक्सचा दर्जा वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली.