इफ्फीचा आज समारोप

0
142

गेल्या २० रोजीपासून सुरू झालेल्या ४७ व्या इफ्फीचा आज डॉ. शामप्रसाद मुखर्जी स्टेडियमध्ये समारोप होणार असून या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणेतील आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक एस्. एस्. राजमौली हे उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम. वेंकय्या नायडू तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे यावेळी हजर असतील. यावेळी उत्कृष्ट चित्रपटासाठीचे सुवर्णमयूर, उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रौप्य मयूर, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, तसेच अहिंसा व शांतीचा संदेश देणार्‍या चित्रपटाला गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

इफ्फीत उत्कृष्ट चित्रपट ठरणार्‍या चित्रपटाला तब्बल ४० लाख रु.चा पुरस्कार प्राप्त होणार असून ही पुरस्काराची रक्कम निर्माता व दिग्दर्शक यांना विभागून देण्यात येणार आहे. त्याशिवाय दिग्दर्शकाला सुवर्ण मयूर व प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. उत्कृष्ट दिग्दर्शकाला रौप्य मयूर, प्रमाणपत्र व १५ लाख रु. असा पुरस्कार देण्यात येईल. उत्कृष्ट अभिनेत्याला व अभिनेत्रीला प्रत्येकी रौप्य मयूर, प्रमाणपत्र व १० लाख रु. असा पुरस्कार देण्यात येईल.
विशेष ज्युरी पुरस्कार
त्याशिवाय विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात येणार असून रौप्य मयूर, १५ लाख रु. रोख, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. हा पुरस्कार दिग्दर्शकाला देण्यात येईल. पदार्पण करणार्‍या दिग्दर्शकाला उत्कृष्ट चित्रपटासाठी शतक महोत्सवी पुरस्कार देण्यात येणार असून रौप्य मयूर, १० लाख रु. व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असेल.
‘एज ऑफ शॅडोज’ने समारोप
समारोप सोहळ्यानंतर ‘एज ऑफ शॅडोज’ हा कोरियन चित्रपट कला अकादमी येथे दाखवण्यात येणार आहे. समारोप सोहळ्याला सुमारे ८ हजार लोक उपस्थित राहणार असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, समारोप सोहळ्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम सज्ज झाले असून काल संध्याकाळी उशिरापर्यंत कलाकार रंगारंग कार्यक्रमाच्या तालमीत मग्न होते. या सोहळ्याच्या प्रवेशिका गेल्या दोन दिवसांपूर्वीच वितरित करण्यात आल्या आहेत. प्रवेशिका नसलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पार्किंगची सोय हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.