
>> ऑस्ट्रेलियाने ‘ऍशेस’ ४-० अशी जिंकली
पाचव्या व शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा काल सोमवारी एक डाव व १२३ धावांनी दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका ४-० अशी जिंकली. सामन्याच्या चौथ्या दिवशी पोटदुखीमुळे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तब्येत ठीक नसतानादेखील रुट पाचव्या दिवशी फलंदाजीस उतरला. तब्येत अधिक खालावल्याने उपहाराच्या वेळेनंतर मात्र त्याने मैदानाची वाट धरली नाही. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या दुसर्या डावातील शेवटचे चार फलंदाज केवळ ३६ धावांत बाद करून इंग्लंडचा दुसरा डाव १८० धावांत संपवला.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने जॉनी बेअरस्टोव (३८), स्टुअर्ट ब्रॉड (४) व मेसन क्रेन (२) यांना तंबूचा रस्ता दाखवत ३९ धावांत ४ बळी असे पृथक्करण राखले. नॅथन लायनने ५४ धावांत ३ गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. इंग्लंडचा पहिला डाव ३४६ धावांत संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या जावात ६४९ धावांचा डोंगर उभारला होता. पॅट कमिन्स सामनावीर तर स्टीव स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. संपूर्ण ऍशेस मालिकेत मिळून इंग्लंडला केवळ तीन शतके लगावता आली तर ऑस्ट्रेलियाने ९ शतके ठोकली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ३४६ (रुट ८३, मलान ६२, कमिन्स ८०-४), ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः ७ बाद ६४९ घोषित (ख्वाजा १७१, शॉन मार्श १५६, मिचेल मार्श १०१, अली १७०-२), इंग्लंड दुसरा डाव ः सर्वबाद १८० (रुट ५८, बॅअरस्टोव ३८, कमिन्स ३९-४)