इंग्लंडकडून पाकचा दारुण पराभव

0
146

>> जॉनी बॅअरस्टोवचे तडाखेबंद शतक

>> इमाम उल हकचे दीडशतक व्यर्थ

जॉनी बॅअरस्टोवने केवळ ७४ चेंडूंत ठोकलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा ६ गडी व ३१ चेंडू राखून दारुण पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेले ३५९ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडने सहज गाठले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्याचे जाणूनही इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गनने संघाला धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळावी यासाठी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. झमान (२) व आझम (१५) यांना तंबूचा रस्ता दाखवत वोक्सने त्यांची २ बाद २७ अशी स्थिती केली. शतकवीर इमाम उल हक व हारिस सोहेल यांनी तिसर्‍या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. गोलंदाज टॉम करन याच्या समयसूचकतेमुळे सोहेल वैयक्तिक ४१ धावांवर धावबाद झाला. मधल्या फळीत आसिफ अलीने ५२ धावांची खेळी केली. त्याने केवळ ४३ चेंडूंचा सामना केला. मालिकेतील त्याचे हे दुसरे व कारकिर्दीतील एकूण तिसरे अर्धशतक ठरले. इमाम उल हकने आपल्या २७ सामन्यांच्या छोटेखानी कारकिर्दीतील तब्बल सहावे शतक झळकावले. त्याने ९७ चेंडूंत शतकी वेस ओलांडली. त्याने १५१ धावा करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. मागील वर्षी झिंबाब्वेविरुद्ध बुलावायो येथे १२८ धावांची खेळी त्याने मागे टाकली. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक धावसंख्येचा फखर झमान (१३८) याचा विक्रमही त्याने मोडला.

धावसंख्येचा पाठलाग करताना जेसन रॉय व जॉनी बॅअरस्टोव यांनी इंग्लंडला १८ षटकांत १५९ धावांची झंझावाती सलामी दिली. आफ्रिदीने मिड ऑफवर वैयक्तिक २१ धावांवर सोडलेल्या झेलाचा पुरेपूर फायदा उठवत रॉयने केवळ ५५ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७६ धावा कुटल्या. त्याचे हे चौदावे वनडे अर्धशतक ठरले. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या लढतीत त्याने ८७ धावांची खेळी साकारली होती. चांगली खेळपट्टी, लहान सीमारेषा व पाकच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा या द्वयीने फायदा उठवला. अश्रफने स्वतःच्या गोलंदाजीवर वैयक्तिक ८६ धावांवर बॅअरस्टोवचा झेल सोडला. यामुळे बॅअरस्टोवला शतक लगावता आले. बॅअरस्टोवने १२ चौकार व ३ षटकारांसह आपले सातवे वनडे शतक साजरे केले. बॅअरस्टोव परतला त्यावेळी इंग्लंडचा संघ २९व्या षटकांत २ बाद २३४ अशा भक्कम स्थितीत होता. यानंतर अनुभवी ज्यो रुट व बेन स्टोक्स यांच्या समयोचित खेळीनंतर मोईन अलीच्या तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने विशाल विजय संपादन केला. पहिला सामना रद्द झाल्यानंतर साऊथहॅम्पटन येथील दुसर्‍या सामन्यात इंग्लंडने १२ धावांनी विजय मिळविला होता. चौथा सामना नॉटिंघम येथे शुक्रवारी खेळविला जाणार आहे.

धावफलक
पाकिस्तान ः इमाम उल हक त्रि. गो. करन १५१ (१३१ चेंडू, १६ चौकार, १ षटकार), फखर झमान झे. रुट गो. वोक्स २, बाबर आझम त्रि. गो. वोक्स १५, हारिस सोहेल धावबाद ४१, सर्फराज अहमद झे. जॉर्डन गो. प्लंकेट २७, आसिफ अली झे. रॉय गो. वोक्स ५२, इमाद वासिम झे. व गो. वोक्स २२, फहीम अश्रफ पायचीत गो. करन १३, हसन अली नाबाद १८, शाहिन शाह आफ्रिदी त्रि. गो. विली ७, जुनेद खान नाबाद ०, अवांतर १०, एकूण ५० षटकांत ९ बाद ३५८
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स १०-०-६७-४, डेव्हिड विली १०-०-८६-१, मोईन अली ६-०-३२-०, लियाम प्लंकेट ९-०-५५-१, टॉम करन १०-०-७४-२, बेन स्टोक्स ४-०-३४-०, ज्यो डेनली १-०-९-०

इंग्लंड ः जेसन रॉय झे. आसिफ अली गो. अश्रफ ७६, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. जुनेद १२८ (९३ चेंडू, १५ चौकार, ४ षटकार), ज्यो रुट झे. आझम गो. वासिम ४३, बेन स्टोक्स धावबाद ३७, मोईन अली नाबाद ४६, ऑईन मॉर्गन नाबाद १७, अवांतर १२, एकूण ४४.५ षटकांत ४ बाद ३५९
गोलंदाजी ः जुनेद खान ८-०-५७-१, शाहिन शाह आफ्रिदी १०-०-८३-०, हसन अली ८-०-५५-०, इमाद वासिम ७-०-५८-१, फहीम अश्रफ ९-०-७५-१, हारिस सोहेल २-०-१९-०, आसिफ अली ०.५-०-९-०