आसाम, केरळम या दोन राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी विधानसभेसाठी आज (दि. 9) एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. असममधील 126, केरळममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान होणार आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत एकूण 2.5 कोटी मतदार आहेत. यामध्ये 1.25 कोटी पुरुष, 1.25 कोटी महिला आणि 343 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 18-19 वयोगटातील सुमारे 5.75 लाख तरुण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 126 जागांसाठी 722 उमेदवार रिंगणात असून, बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. राज्याच्या 15व्या विधानसभा कार्यकाळाची मुदत 20 मे 2026 रोजी संपत आहे.
केरळम विधानसभा निवडणुकीत 140 जागांसाठी 890 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. येथे प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत होत आहे. सत्तास्थापनेसाठी 71 जागांचे बहुमत आवश्यक आहे. राज्यात एकूण 2.71 कोटी मतदार असून, त्यात 1.32 कोटी पुरुष, 1.39 कोटी महिला आणि 273 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 5 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. येथे सरकार स्थापनेसाठी 16 जागांचे बहुमत आवश्यक आहे. एकूण 9.44 लाख मतदार असून, त्यात सुमारे 4.43 लाख पुरुष, 5 लाख महिला आणि 139 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.