- पौर्णिमा केरकर
मेघश्याम आषाढाला अंगांगाला माखून घेत हा अद्वैताचा आषाढ सोहळा चालू असतो. या इथे देहभान हरपते. भक्तीची ही उत्कटता आपपर भाव विसरायला लावते. आभाळाएवढी उंची असलेल्यांनासुद्धा मातीशी समरस करते. माती आणि निसर्ग यांच्याशी तादात्म्य पावून मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांना अधोरेखित करतो आणि आषाढ धुवांधार कोसळत राहतो…
आषाढ म्हटले की पहिल्या प्रथम आठवते ते कालिदासाचे मेघदूत. या महिन्याचा पहिला दिवस हा मेघदूतासाठी खास राखून ठेवलेला. आसमंत काळोखात तुडुंबलेला असतानाच मेघ दूत बनून प्रवास करतात. प्रियकराचा निरोप प्रेयसीला देण्यासाठी त्यांनी हा मैलोन्मैलाचा प्रवास केलेला असतो. आषाढाला अशारीर प्रेमाची उत्कटता लाभलेली आहे. आषाढ धुवांधार कोसळतो म्हणून तो वेगळा भासतो. आषाढाला ‘आषाढस्य प्रथम दिवसें मेघमाश्लिष्टसानुं, वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श’ ही जशी प्रेमाची उत्कटता लाभलेली आहे, तशीच त्याला तत्त्वचिंतनाची बैठक लाभलेली आहे. लोकपरंपरेत तर आषाढाचे वेगळेपण वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जाणवते. आषाढाच्या येण्याची चाहूल गुडूप अंधारातून होत जाते. आभाळ भरून आलेली ढगांची दाटी, आसमंत काळोखात तुडुंबलेला, सभोवतालचा निसर्ग निश्चल, पक्ष्यांची हालचाल मंदावलेली. एवढ्यातच तो धो-धो कोसळतो. सलग कोसळत राहातो… कधी कधी तर तो महिनाभर थांबण्याचे नाव काढीत नाही. तरीही हवाहवासा वाटतो. आषाढाला भक्तीचे माहात्म्य वेढून राहिलेले आहे. हा प्रवास मेघांचा जसा आहे तसाच तो पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. आजूबाजूला असलेली झाडे चिंब भिजलेली. वाऱ्याने तर त्यांना मुळापासून गदागदा हलवून हलवून हैराण करून सोडलेले. परंतु वाऱ्याच्या धसमुसळेपणाला ती पुरून उरत होती. त्यांच्यात एक तऱ्हेचा परिपक्वपणा आला होता. पानांचा गडद हिरवा रंग याची ग्वाही देत होता. या गडद हिरव्या, मेघश्याम रंगांच्या सोबतीला डोंगर जणू काही ओल्या निळाईचे आच्छादन घेऊन धीरगंभीर उभे आहेत असेच वाटते. वारकऱ्यांच्या उत्साहाचा हा महिना पायी वारी करीत असताना देहभान विसरायला लावतो. रिंगणात गोल गोल फिरतो. टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल देहमनात भिनत जातो. इथे आपपर भाव मिटतो. याचवेळी एखाद्या सासुरवाशिणीला उंबरा ओलांडून पंढरेला जाता येत नसेल, ती व्यापातापात गुरफटून गेली असेल तर मात्र ती-
माझ्या नि वांगडनी
दिल्या त्या देशोदेशी
आषाढी एकादशी
आमी मिळूया पंढरेशी
ही आशा मनी बाळगते व पांडुरंगाच्या जिवावर सुखद अनुभूती घेते. वारीची नितळता प्रत्येक पावलात असते. त्या पावलांची समरसता आषाढाला वेगळा साज चढवते.
वारी भागवत भक्तीचा अपूर्व सोहळा. लहानांपासून थोरांना आकर्षित करणारी. त्यासाठी मोठं अंतर पार करणारी. पंढरपूरच्या विठ्ठलाप्रतिची ओढ. कष्ट आणि कष्टच करणाऱ्या या लोकगायिकांनी पांडुरंगाला मनीमानसी भिनवून घेत त्यावर कवने रचली-
पंढरेच्या पांडुरंगा विठ्ठला रे
लवकर ये रे कंठ
माझा दाटला रे
जनीच्या गे घरी
देव दळण दळीं
दळण दळताना
आनंद वाटला रे
लवकर येरे कंठ
माझा दाटला रे
असे म्हणून मेघश्याम सावळ्या विठुरायाशी असलेले सख्य अधिक दृढ करतात. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साखळी- विठ्ठलापूर, फोंडा, सांगे आणि माशेल येथे मंदिराच्या प्रांगणात चिखलकाला होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यात भाग घेतात. श्रीकृष्णाच्या लीलांचा तो अभूतपूर्व सोहळा असतो. मुखातून ‘जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी’च्या नामघोषात परिसर दुमदुमून जातो. अंग चिखलाने माखून गेलेले असते. विठुराया आणि श्रीकृष्ण यांच्याप्रति असलेल्या भक्तीचे ते अद्वैत असते. दुर्गा भागवतांनी आषाढाला ‘मेघश्याम आषाढ’ म्हटलेले आहे. येथे तर याच मेघश्याम आषाढाला अंगांगाला माखून घेत हा अद्वैताचा आषाढ सोहळा चालू असतो. या इथे देहभान हरपते. भक्तीची ही उत्कटता आपपर भाव विसरायला लावते. आभाळाएवढी उंची असलेल्यांनासुद्धा मातीशी समरस करते. माती आणि निसर्ग यांच्याशी तादात्म्य पावून मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांना अधोरेखित करतो आणि आषाढ धुवांधार कोसळत राहतो.
काणकोण, केपे, सांगेसारख्या तालुक्यांतील अनेक गावांत आषाढी पुनवेला वेळीप आदिवासी समाजातील लोकमानस त्यांच्या सण-समारंभात महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या करमळाच्या पानांना पुनश्च नव्याने सामावून घेतानाचा विधी करतात. त्यासाठी आषाढाचे पाणी पिऊन तृप्त, टवटवीत झालेल्या या पानांना आगळीवेगळी तकाकी आलेली असते. त्या पानावर प्रसादाची वाडी करून ती समाजबांधवांना दिली जाते. हा विधी करण्यासाठी खास आषाढाची वाट लोकमन पाहत असते. त्यासाठी देवराईत ‘पान्न’मध्ये जाऊन विधी करतात. त्यानंतर मात्र आपल्या उत्सवात करमळ पानांचा वापर करण्यासाठी लोक मोकळे होतात.
वसंतासारखा आषाढ रंगीत, गंधीत , कोवळा, लुसलुशीत आणि गुलाबी छटेचा नाही. असे असले तरी तो कवठी चाफा, सोनचाफ्याला बहर देतो. तो परिपक्व आहे. प्राजक्त सड्याने अंगण रेखतो, जास्वंदी फुलांचे वैभव जपतो. अनंताला भरभरून फुलवतो. कदंबाला कवेत घेता त्याच्या गोल टपोऱ्या कळ्यांतून शेकडो फुले उमलतात आणि पानांमागून डोकावणारी ती फुले सभोवताल सुगंधित करून फुलपाखरांना वश करतात. आषाढाचा पाऊस जेव्हा कदंबाच्या पानापानांवर टपटपतो तेव्हा कदंब कळ्या-फुलासकट पावसाशी झोंबाझोंबी करतो. कदंब वृक्षाची ही चंचलता नसते तर आषाढावरील त्याचे निर्व्याज प्रेम इथे जाणवते. आषाढाला अध्यात्माची बैठक लाभलेली आहे. व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श आषाढाला आहे. महाभारत लिहिणाऱ्या व्यासमुनींचा जन्म आषाढातला. या महाकाव्याची गुंतागुंत, त्यातून अधोरेखित झालेल्या अद्भुत श्रद्धा-अंधश्रद्धांनी भरलेले जग, वास्तवाची अनुभूती देणारा कौटुंबिक संघर्ष, कल्पनेच्या पलीकडील सारे विश्व अचंबित करते. मेघ:श्यामल असा आषाढ पाऊस धीरगंभीर होत होत रहस्यमयी गोल गोल फिरतो.
निसर्गाचे आंतरिक द्वंद्व येथे आहे. तो काळोखाने वेढलेला आहे. मात्र आषाढाला हा काळोख सर्जकतेने जोडू पाहत आहे. तो रहस्यमयी, गूढ आहे खरा; परंतु त्यातूनच नवनिर्मिती होते. आषाढाचा पाऊस जेव्हा घनघोर, बिनघोर कोसळत असतो तेव्हा माड मोर बनून नाचत असतात. तनामनाला धुंदी चढते. अशावेळी नाचत असतात निळे मोर रानात, कुणग्यात, नदीकाठाने आणि घरालगतच्या कुळागरात. पानापानांतून पाऊस झिम्माडत असतो. नसानसांत भिनत जातो. तो कधी शब्द होतो, तर कधी मौनातूनच व्यक्त होतो… सळसळतो… झंकारतो…
मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत-
झंकारती फांद्या आणि
सळाळती पाने
पक्षी येती वाऱ्यावर
गात नवे गाणे
गाभ्यामध्ये आत आत
खोल मौन राही
उत्सवात झाडाला ते
आठवत नाही…
झाडे अगदी हिरव्या ध्यानमुद्रेत असावीत अशीच भासतात. आषाढाच्या आवेगाने ती उन्मळून पडत नाहीत तर त्यांचा उन्माद उन्मनी अवस्थेला पोहोचलेला असतो असेच जणू वाटते. भक्तिरंग अधिकच गडद दाटसावळा होत जातो. हे भक्तिचैतन्य सर्वसामान्यांच्या पातळीवर येते तेव्हा त्याला प्रापंचिक धाग्यांनी विणलेल्या आठवणींचा पोत लाभतो.
आषाढाशी निगडित अनेक समजुती, संकेत, विधी, परंपरा समाजमनात आहेत. मुलगी लग्न करून सासरी गेली की ती नवीन असताना तिने म्हणे सासरची तसेच माहेरची आषाढाची पहिली पावळी बघता कामा नये. म्हणून सासुरवाशिण या महिन्यातील एक रात्र नातेवाईक, मित्रमंडळीच्या घरी घालवते. ही खूप वर्षांची परंपरा लोक मानीत आलेले आहेत. या आषाढाला नात्यांची असीम ओढ आहे. खासकरून माऊली आपल्या सासरी लग्न करून दिलेल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेली असते. बाहेर आषाढाचा पाऊस झरझरून कोसळतो, तर आत घरात जात्यावर बसून दळण दळत असलेली माऊली-
पाऊस घडोघडी, आदो मिरग पानी करी
माऊली चिंता करी, लेकी उरल्यो परघरी
लामनी माझे केस, डोंगराचे गे येली
माऊली माता माझी, जटा बघुनी तेल घाली…
असा हा आषाढी पाऊस हृदयात खोल खोल झरत असतो, भिनत जातो… नाचत असतो कृष्णाच्या गवळणीसारखा-
पावसा वाचुनी
बावल्या कमळणी
कृष्णा वाचोनी
वेड्या झाल्या
त्या गवळणी
अशीच अवस्था झालेली असते. याच महिन्यात ‘दादरा’ नावाचा विधी केला जायचा. एरव्ही तिन्हीसांजेला घरातील कचरा काढता कामा नये हा लोकसंकेत आहे. परंतु ‘दादऱ्या’च्या दिवशी कचरा काढून बाहेर ठेवला जातो, जेणेकरून घरातील वाईट गोष्टी नाहीशा होऊन लक्ष्मीचा निवास घराला कायमस्वरूपी लाभायला हवा, ही त्यामागची धारणा आहे.
आषाढ पूर्वतयारी करतो श्रावणाच्या स्वागताची. आषाढात परिपक्व झालेली झाडे फळण्यासाठी, फुलण्यासाठी उत्सुक असतात. श्रावणात ती ऐन बहरात येतात. झाकोळून गेलेले आभाळ मोकळे होत जाते. शांत निळाईची झाक सर्वत्र दिसते. हिरवाईची गडदता आता हळूहळू पोपटी रंगात परिवर्तित होते. हिरव्या, पिवळ्या, लाल, जांभळ्या फुलांनी सडे बहरून जातात… आषाढाने प्रवाहित केलेले झरे, धबधबे, वझरे यांचा आवेग थोडासा मंदावतो. तो कड्याकपारीतून कोसळतो, जमिनीत झिरपतो, कातळावरून सळसळतो अन् मग श्रावणाशी सलगी करीत रंध्रारंध्रात झिणझिणत राहतो. पाडगावकरांच्याच शब्दांत-
मेघ काळेभोर, काजळाचे मोर धुंद झाले
सर्वस्व आंदोळे, झाडांचे हिंदोळे झपाटले
पाऊस झेलला, सर्वांगी भोगला अनावर…