आश्‍वासनांचा सरकारला विसर

0
110

पाठिंबा काढून घेण्याचा रोहन खंवटेंचा इशारा
विधानसभेत देण्यात आलेल्या सर्व आश्‍वासनाना सरकारने वाटण्याच्या अक्षता लावल्या असून सरकारने आपले जनता विरोधी धोरण चालूच ठेवल्यास सरकारला दिलेल्या पाठिंब्याच्या बाबतीत विचार करावा लागेल, असा इशारा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. भाजपने कॅसिनोला विरोधात असताना विरोध केला होता. नव्या कॅसिनोला थारा न देण्याचे तसेच मांडवी नदीच्या पात्रातील कॅसिनो हटण्यिाचे विधानसभेत आश्‍वासन दिले होते.आता त्याच सरकारच्या बंदर कप्तानांनी एमव्ही. फ्लोटेक नावांच्या कॅसिनो जहाजाला मान्यता दिली आहे. या फ्लोटोलवर निवासाची व्यवस्थाही असेल, त्यामुळे सरकार कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कॅसिनोमुळे गोव्यातील युवक बरबाद झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत गोव्यातील कॅसिनो बंद करण्याची मागणी खंवटे यांनी केली आहे.
विधानसभेत दिलेल्या आश्‍वासनांचे पालन न केल्यास विधानसभेला महत्वच राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याला विशेष राज्याचा दर्जा, कॅसिनो या विषयांवर जी भूमिका घेतली आहे, ती चिंताजनक असल्याचे खंवटे म्हणाले. खाजगी वनक्षेत्राच्या बाबतीत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही जमिनी लोकांना वारसा हक्काने मिळालेल्या आहेत. त्यांचा वनक्षेत्रात समावेश झाल्याने विकासावर परिणाम झाला आहे. वनक्षेत्र, किनारी नियमन विभाग यामुळे ४५ टक्के जमिनीवर विकास होऊ शकत नाही. खाजगी जमिनी वनक्षेत्रातून मुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.