Home Featured आशाताईंच्या गीतांनी सांस्कृतिक वारसा समृद्ध

आशाताईंच्या गीतांनी सांस्कृतिक वारसा समृद्ध

0

पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केले दुःख

संगीत विश्वावर शोककळा

काल रविवारी प्रख्यात गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन असे मराठीत लिहिले आहे.

स्वर्गीय सूर हरपला : मुख्यमंत्री डॉ. सावंत

महान पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अतिव दु:ख व्यक्त केले आहे. या श्रेष्ठ पार्श्वगायिकेला श्रद्धांजली वाहताना त्यांनी म्हटले आहे की आशा भोसले यांचा स्वर हा स्वर्गीय असा होता आणि भारतीय संगीताच्या जगताला नवा आकार देणारा ठरला. भारत भरातील लोकांच्या हृदयाला तो स्पर्शून गेला. त्यांनी गायिलेली विविध भाषांतील गाणी ही अजरामर अशी असल्याचे सांगून ती संगीतप्रेमींच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना त्यांच्या जाण्याचे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

महान गायिका व माणूस ः हेमा सरदेसाई (पार्श्वगायिका)
आशा भोसले यांचे जाणे हे फार दु:खदायक असे आहे. पण त्यांचे निधन झाले असले तरी त्यांचा स्वर्गीय आवाज हा कायमच राहणार आहे. त्यांचा आवाज व त्यांची गाण्यांची शैली ही संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती. काही वेळा त्यांचा सहवासही मला लाभला. माझे आजोबा व्यंकटेश सरदेसाई व पं. दीनानाथ मंगेशकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे लता मंगेशकर व आशा भोसले यांचेही आमच्या घरी येणे जाणे व्हायचे. नंतर मी पार्श्वगायिका झाल्यानंतर ‘के. फॉर किशोर’ ह्या दूरचित्रवाणीवरील रिॲलिटी शोमध्ये त्यांच्याबरोबर मी व संगीतकार बप्पी लहरी अशी आम्ही तिघे जण स्पर्धेचे परीक्षक होतो. आशा भोसले ह्या एक महान गायिका तर होत्याच पण माणूस म्हणूनही खूप चांगल्या होत्या.
मी पार्श्वगायिका झाल्यानंतर माझे वडील म्हणायचे, की मी दीनानाथ मंगेशकर यांच्या आशीर्वादामुळेच गायिका बनले.

सुरांची सुंदर बाग ः देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना, 3 वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी भावना व्यक्त केली. आशा भोसले यांच्या निधनावर हेमा मालिनी यांनी दुःख व्यक्त करताना, आशाताई आता आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या खूप उत्साही होत्या आणि त्यांच्या गाण्यांमधील ऊर्जा आणि भावनांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली. माझ्यासाठी हा क्षण अधिकच भावनिक आहे, कारण माझे त्यांच्याशी एक विशेष नाते होते. त्यांनी त्यांच्या अनोख्या आवाजाने आणि शैलीने माझ्या अनेक चित्रपटांतील गाणी लोकप्रिय केली. लताजी आणि आशाजी या दोघींशीही माझे खूप खास नाते होते, ज्यांनी माझ्या चित्रपट कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. ही महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची अशी हानी आहे, जी कधीही भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आशाताई अष्टपैलू गायिका : डॉ. प्रवीण गावकर

कला अकादमी पणजीचे उपाध्यक्ष व गोमंतकीय शास्त्रीय गायक प्रवीण गावकर यांनी, आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना, त्या एक अष्टपैलू अशा पार्श्वगायिका होत्या. त्यांनी चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, भजन, कव्वाली, पॉप संगीत, गजल अशा सर्व प्रकारची गाणी गाऊन ती अजरामर केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील कित्येक संगीतकार हे आशा भोसले यांना डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्यासाठी विशेष असे संगीत संयोजन करायचे. आणि आशा भोसले ही गाणी आपल्या अनोख्या अशा गायकीने अजरामर करायच्या. त्यांचा स्वभाव हा सकारात्मक, उत्साही, धाडसी तसाच मिष्किल व नर्मविनोदी असा होता. आणि त्यांच्या या गुणांचे प्रतिबिंब हे त्यांच्या गायकीतून उमटलेले दिसायचे.
या ईहलोकातील त्यांची यात्रा आता संपली असली तरी त्याची अजरामर अशी गाणी व स्वर हा सदैव कायम राहणार आहे असे म्हटले आहे.

क्रीडाविश्वाकडून श्रद्धांजली

आशाताईंच्या निधनानंतर क्रीडा जगतातील दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने, आजचा दिवस भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशा ताई म्हणजे कुटुंबच होत्या. आज या दुःखाचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. जणू काळच थांबून गेला आहे असे वाटत आहे. आशाताईंनी आमचे आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकले अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.

2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातील हिरो युवराज सिंग याने, आशा भोसले यांच्या गाण्यांवरच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे बालपणाचा एक भागच शांत झाला आहे असे वाटत असल्याचे म्हटले आहे.

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने, आशा भोसले यांच्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांची मने जिंकली. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांची परंपरा सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील असे म्हटले आहे.
युसूफ पठाण, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी आशाताईंचा सुरेल आवाज सदैव अमर राहील असे म्हटले आहे.