आल्तिनो – पणजी येथे अंदाजे १७ कोटी ९९ लाख ३६ हजार ९५९ रुपये खर्चून नवीन ३३/११ केव्ही गॅस इन्सुलेटेड उप वीज केंद्र उभारण्यात येणार आहे.
वीज खात्याने या वीज उपकेंद्राची रचना, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि चालू करण्यासाठी निविदा जारी केली आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेखाली हे वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. इच्छुक ठेकेदारांसाठी निविदा ऑन लाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आली असून १५ ऑक्टोबर २०१९ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भरलेल्या निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. निविदा १७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता उघडण्यात येणार आहे. ठेकेदाराला एका वर्षात वीज केंद्र उभारावे लागणार आहे.
येथील नागरिकांना विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागत आहे. आल्तिनो येथे असलेल्या वीज उप केंद्राला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याने जुनाट झाले. तसेच आल्तिनो पणजी परिसरात बांधकामाच्या प्रमाणात वाढ झाल्याने विजेची मागणी वाढलेली आहे. नवीन साधन सुविधा न उभारताच नवीन वीज कनेक्शन दिली जात असल्याने विजेची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे नवीन वीज उपवीज केंद्र उभारण्याची मागणी केली जात आहे.
वीज खात्याने पाटो पणजी येथे अंदाजे २२ कोटी ४६ लाख रुपये खर्चून नवीन गॅस इन्सुलेटेड उपवीज केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. पणजी परिसरातील विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या विजेचा पुरवठा करण्यासाठी नवीन अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे.