..तर शॅकमालक किनार्‍यांवर ब्ल्यू फ्लॅग निर्णयाला विरोध करणार

0
90

राज्यातील शॅक मालक कल्याण सोसायटीच्या काल झालेल्या बैठकीत राज्यातील १० किनार्‍यांना ‘ब्ल्यू प्लॅग’ प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सरकारने शॅक मालकांसह अन्य घटकांना विश्‍वासात न घेता किनार्‍यांना ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्याचे ठरवण्यात आले.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गोवा सरकार राज्यातील १० किनार्‍यांचे ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्राने नामांकन करू पाहत आहे. मात्र, हे नामांकन झाल्यास या किनार्‍यांवर कोणकोणत्या मर्यादा येणार आहेत हे सरकारने आम्हाला सांगायला हवे. आम्हाला काळोखात ठेऊन जर सरकारने राज्यातील १० किनार्‍यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जोरदार विरोध करण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला असे संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी काल बैठकीनंतर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

किनारी व्यवस्थापन आराखडा गोवा सरकारने तयार केलेला नसल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय हरित लवादाने हा आराखडा तयार करण्यात येईपर्यंत राज्यातील किनार्‍यांवर शॅक्स उभारू देणार नसल्याचा आदेश दिल्याने राज्यातील शॅकमालक संकटात सापडलेले असतानाच आता ब्ल्यू फ्लॅगचे नवे संकट उभे ठाकले असल्याचे कार्दोज म्हणाले. सरकारने ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विश्‍वासात घ्यावे. ब्ल्यू फ्लॅग संबंधीची सगळी माहिती आम्हाला द्यावी. ‘ब्ल्यू फ्लॅग’मुळे किनार्‍यावरील व्यावसायिकांवर कोणती मर्यादा घालण्यात येईल हे सरकारने आम्हाला सांगायला हवे, असे कार्दोज यांनी सांगितले.