आला श्रावण…

0
4
  • मीना समुद्र

पावसाचे पाणी आणि पाण्याची गाणी गात हिरवाईने मढून श्रावण आला आहे. नवनवीन फुलापानांची लेणी लेवून श्रावण आला आहे. वैशाखवणव्यात होरपळलेली क्लांत मने शांत करीत श्रावण आला आहे. सृष्टीच्या सर्जनाचे आगळे रूप दावीत श्रावण आला आहे. ऊन-पावसाचा लपंडाव खेळत हासरा, नाचरा, लाजरा श्रावण आला आहे.

आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने, प्यावा वर्षाऋतू तरी!
कविवर्य मर्ढेकर यांनी म्हटल्याप्रमाणे असोशी वाढवणारा असा हा ऋतू आता आला आहे. भारतीय ऋतुचक्रातल्या वर्षाऋतूचा मेघमल्हार आता आभाळी रंगला आहे. सारी सृष्टी जीवाचे कान करून तो ऐकत आहे. या श्रावणाच्या खुणा वर्षेचे वरदान लेवून अंगोपांगी खुलत आहेत. मोती पिकवायला आसुसलेली धरणी धसमुसळ्या आषाढी मेघवर्षावाने तृप्त झाली आहे.

पाऊस तर सर्वत्र सारखाच पडतो. गरिबांच्या चंद्रमौळी झोपडीवर; श्रीमंतांच्या गगनभेदी प्रासादावर; घरावर-दारावर, अंगणा-परसात… झाडे-झुडपे-लता-वेली, डोंगरदऱ्या-दगडमाती, अगदी रस्त्यावर… त्यातल्या खाचखळग्यांमध्ये; नद्या-विहिरी-सागर… सर्वत्र तो सारखाच पडतो. तसाच तो पडला आहे. मातीत कमालीचे मार्दव आले आहे आणि मातीचे हे मार्दव इकडेतिकडे चोहीकडे हिरवाईच्या रूपाने अंकुरत आहे. लालुस-पोपटी कोंभाची लवलव सर्वत्र दिसते आहे. ठायीठायी हरिततृणांच्या मखमालीचे गालिचे उलगडले आहेत. दगडधोंड्यांनी अन्‌‍ कड्याकातळांनीही शैवाळाच्या शाली पांघरल्या आहेत. जिथेतिथे कुठली कुठली अनोखी रोपटी जांभळ्या, निळ्या, पिवळ्या, गुलाबी अशा चिटक्या-मिटक्या फुलांनी सजलीधजली आहेत. इथेतिथे झिलाने, जलस्थळे आषाढ-श्रावणाच्या प्रेमाने ऊरी दाटली आहेत. पावसाचे पाणी आणि पाण्याची गाणी गात हिरवाईने मढून श्रावण आला आहे. नवनवीन फुलापानांची लेणी लेवून श्रावण आला आहे. वैशाखवणव्यात होरपळलेली क्लांत मने शांत करीत श्रावण आला आहे. सृष्टीच्या सर्जनाचे आगळे रूप दावीत श्रावण आला आहे. ऊन-पावसाचा लपंडाव खेळत हासरा, नाचरा, लाजरा श्रावण आला आहे. कविवर्य बाकीबाबांच्या शब्दांत सांगायचे तर- ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ असा चैतन्यमय श्रावण जलस्थलांचे आरसे बनवीत चमकत-झमकत आला आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ महिन्यांनंतरचा हा पाचवा महिना पाचूसारखा हिरवागार होऊन प्रसन्नता पेरीत आला आहे. या ‘हिरवळ आणि पाण्याने’ कवींची अंतःकरणे द्रविभूत होऊन त्यांना गाणी सुचत आहेत. त्यांना वर्षेच्या पैंजणाचा नाद आहे. नाना विभ्रम दाखवीत येणाऱ्या या श्रावणाचे बालकवींनी रेखाटलेले सुंदर शब्दचित्र तर अजरामरच झाले आहे-
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे!
श्रावणाचा सूर्योदय काय किंवा सूर्यास्त काय- दोन्ही अतिशय सुंदर, नाना रंगढंगांनी सजलेले. पारिजात, सोनचाफा, बकुळी, निशिगंधा.. पानोपानी अशी सुगंधी फुले आणि रानोवनी दरवळणारा मत्त केवडा- श्रावणाशी घट्ट मैत्र असणारी ही पुष्पसृष्टी. त्यातून इवल्याइवल्याशा चांदणठिपक्यांनी बहरलेली जुई म्हणजे सुगंधी अत्तरकुपीच! इंद्रधनुष्याच्या अद्भुत कमानीखालून येणाऱ्या श्रावणाचे सर्वत्र असे हे सुगंधी स्वागत! पीकपाण्याचा दिलासा देऊन सगळ्यांना आपल्या अनुपम लावण्याने मुग्ध करणारा असा श्रावण आता आलाय. अशावेळी महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूता’तली एक पंक्ती यावेळी आठवेल अशी स्थितीही कुठे कुठे दिसते.
‘मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः।’ पावसाळ्याच्या दिवसांत मेघाला पाहून सुखी लोकही बेचैन, अस्वस्थ होतात तर ज्यांच्या प्रिय व्यक्ती त्यांच्यापासून दूर आहेत त्यांची चित्तवृत्ती स्थिर, आनंदी कशी असू शकेल? त्यामुळेच ‘श्रावण वैरी बरसे रिमझिम, चैन पडेना जीवा क्षणभर’ किंवा ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’ अशी घालमेलीची स्थिती गाण्यातून आढळते तेव्हा श्रावणाच्या असीम सौंदर्याला ही जणू हुरहुरीची काजळतिटीच लागलेली आहे असे वाटते. आजच्या काळातले अतिशय प्रथितयश सिद्धहस्त कवी श्री. वैभव जोशी हेही ‘तुझी आठवण’ कवितेत लिहून जातात-

मेघांभवती सुवर्णकंकण
सरीसरीतुन सुरेल नर्तन
थेंब नवे पण जुनाच श्रावण- तुझी आठवण.
असा हा आठवणींचा श्रावण. हिंदी गाण्यातून ‘आया सावन झुम के’ म्हणत तो येतो. ‘गरजत बरसत सावन आयो रे’, ‘रिमझिम रिमझिम सावन बरसे’, ‘सावन का महीना पवन करे शोर’ अशा अनेक गाण्यांतून मनाचा मोरपिसाला फुलवतो. मंगेश पाडगावकर श्रावणाचे लावण्य वर्णन करतात-
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडातुन अवचित हिरवा मोरपिसारा
श्रावण हा प्रत्येक निसर्गकविता लिहिणाऱ्याच्या मनातला पिसारा फुलवून नाचणारा मोर असतो. श्रावणाच्या केवळ वर्णनाने कवितेचे लावण्य उतू जात असते. श्रावण हेच मुळी सृष्टीचे अनुपम काव्य आहे. आणि म्हणून कविवर्य शंकर रामाणींच्या ओठावर अतिसुंदर शब्द येतात-
उमलते अचानक सोनकेवड्याची सर
थेंबाथेंबात तरंगे ओल्या आभाळाचा सूर
अशा ओल्या सुरात ‘सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं’ म्हणत बाकीबाबांचा लयतालबद्ध सूर मिसळतो आणि श्रावणाचे चैतन्य माणसाच्या अंगी घुमू लागते.

श्रावण सर्वांनाच प्रिय- पण स्त्रियांना विशेषतः त्याचा जास्तच लळा. श्रावण ही नववधूंना सणा-उत्सवांसाठी माहेरी यायची सुवर्णसंधी. मेंदीमाखल्या हातात बांगड्या भरून, फुलांचे गजरे केसांत माळून हिंदोळ्यावर आंदुळायचा हाच मुक्त काळ. नवनवे वस्त्रालंकार परिधान करून रविवारी आदित्यपूजा, सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरीची पूजा आणि रात्र जागवत खेळले जाणारे झिम्मा-फुगड्या-पिंगा, गोफ विणू बाई गोफ विणू, आटुशा पटुशा, कुरतन मिरची जाशील कैसी, लाटणी-करवंट्यांचा उपयोग करीत रंगलेले खेळ, फेराची गाणी गात केलेली रात्रीची जागरणं; बुध-गुरुवारी बुधबृहस्पती आणि शुक्रवारी लक्ष्मीपूजा, समईपूजन, चणे-फुटाणे-दूध देऊन केलेलं हळदीकुंकू, जिवतीपूजा, मुलाबाळांचं औक्षण, पुरणपोळीचा खास नैवेद्य; शनिवारी मारुतीरायाला रुईच्या फुलांचा हार, तेल-नारळ अशी सारी व्रताचरणे स्त्रिया अतिशय मनःपूर्वक, समारंभपूर्वक करत असतात. वारांच्या कहाण्या हे श्रावणाचे वैशिष्ट्य. त्या चित्रविचित्र कहाण्या श्रद्धेने वाचल्या जातात, मनोभावे ऐकल्या जातात. सुफलतेने जीवन जगण्याचा कानमंत्र त्या कहाण्यांतून मिळतो. मनाचे पोषण करणाऱ्या या कहाण्या.

श्रावणाचा प्रत्येक दिवस अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे चातुर्मासाच्या सुरुवातीचा हा महिना शुभारंभी समजतात आणि त्यात शुद्ध आचरण अपेक्षित असते. एरव्हीच्या मोकाट किंवा अतिमुक्त वा मनमान्या आयुष्याला श्रावण संयमाचा दंडक घालून देतो. अभक्ष्यभक्षण, अपेयपान हे सारे वर्ज्य असते आणि पूजाअर्चा शुचिर्भूततेने केल्या जातात. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीपासून इतरही सणवारांची सुरुवात होते. आदल्या दिवशी श्रावणी केली जाते आणि नागपंचमी हा शेतकरी समुदायाचा सण खेड्यापाड्यातून आणि शहरी भागातूनही मातीचा नाग आणून साजरा केला जातो. शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागाची पूजा म्हणजे प्राणिमात्रांविषयी दाखवलेली कृतज्ञता होय. बायका-पोरी नवीन वस्त्रालंकार परिधान करून ‘चल गं सये वारुळाला’ म्हणत गाणे गात वारुळाच्या पूजेला जातात. श्रावण शुद्ध पौर्णिमा हे व्यापारउदिमासाठी जलमार्गाने जाणाऱ्या व्यापारीवर्गासाठी, त्यांच्या रक्षणासाठी उधाणलेल्या सागराला घातलेले साकडेच! त्याला नारळ अर्पण करतात आणि नारळाचे गोडधोडाचे पदार्थ करून नारळी पौर्णिमा साजरी होते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला तिचे त्याने रक्षण करावे म्हणून राखी बांधते आणि नात्याचे रेशिमबंध दृढ करते. श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्णजन्म होतो म्हणून ही जन्माष्टमी मोठ्या धूमधडाक्यात गोवर्धन पर्वत, दहीहंडी अशा स्वरूपात साजरी होते. गीतेद्वारे माणसाचे उत्थान करणाऱ्या जगद्गुरू कृष्णाची ही जयंती. हा श्रावणाचा आणि आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. वसंतात सृष्टीच्या सौंदर्याचा आणि वैभवाचा परिपूर्ण असा आविष्कार दिसतो. पण त्यात वसंतदाहाचा निखार असतो. श्रावणात मात्र सृष्टीच्या शीतलतेचा स्वीकार दिसतो. असीम अशा शांतीचा तो साक्षात्कार असतो. त्यामुळे सृष्टिकर्त्याविषयीच्या भावभक्तीचा अंगीकार श्रावणात होतो. श्रावण हा श्रवणाचा महिना आणि ‘श्रवणभक्ती ही श्रेष्ठ अवघ्यात’ या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय हा महिना देतो. माणसाच्या मनात तो समाधानाचे चित्र साकार करतो. यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक वार शुभ असल्याने आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याने तो अलंकृत झालेला असतो. लहान-थोर, स्त्री-पुरुष साऱ्यांना सामावून घेणारा हा श्रावण म्हणून तर लोकमानसांत विलक्षण कौतुकाचा ठरला आहे. श्रावण येण्याआधीच कित्येक दिवस ‘श्रावण आलाच आता, दिवस कसे कापरासारखे उडून जातील कळणारसुद्धा नाही’ असे उद्गार निघत असतात. कुणी आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचे नियम, व्रतवैकल्ये, पोथ्यापुराणांचे वाचन सुरू करते, तर कुणी श्रावणापासून याची सुरुवात करतात. आपल्या नेहमीच्या जगण्याला, आचरणाला श्रावण मांगल्याची, भावभक्तीची किनार देतो.

परंपरेतून आलेला श्रावण हा असा अतिशय पवित्र, सात्त्विक वृत्ती जोपासणारा, सोज्वळ भावनेचा, नात्यांचे रेशिमबंध जपणारा, प्रतीक्षा आणि मीलनातला गोडवा जपणारा, सर्जनशील आणि सौंदर्याची सारी कवाडं उघडी करणारा. मनाला शांती, समाधान, तृप्तता, गारवा देणारा. आजपर्यंत मनापासून जपलेला, जागविलेला.
आजकाल मात्र असा श्रावण यंत्रतंत्रयुगाच्या चपेट्यात कुठेतरी हरवत चालला आहे की काय, असे कधीकधी वाटते. तो कृतीत उतरावा, आचरावा असं वाटतं. तरी माणसांना आज वेळच उरलेला नाही. अशा सुंदर श्रावणाचे दर्शन घ्यायला, घडीभर सुखाने निसर्गाजवळ जायलाही त्याला वेळ नाही. आधुनिकतेचा, आभासी दुनियेचा आणि कृत्रिमतेलाच अकृत्रिम मानण्याचा हव्यास त्याला जडला आहे. सुखसोयीसाठी निसर्गाच्या ऱ्हासास तो कारणीभूत आहे. प्रचंड लोकसंख्यावाढ नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरवठा पुरेसा होण्यास अडथळा ठरत आहे. हवाप्रदूषण, जलप्रदूषण, अन्नधान्य प्रदूषण या सर्वांसाठी त्याची बेफिकिरी कारणीभूत आहे. जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गरजाही तो भागवू शकत नाही. रासायनिक पदार्थांचा वापर हाही आरोग्य बिघडवण्यास कारण ठरत आहे. त्याच्यात अंगीभूत असणारे मद, मत्सर, क्रोध, मोह, दंभ, लोभ हे विकार. त्यावर विवेकाचा अंकुश असेल तर मन ताब्यात राहते आणि अघटित गोष्टींना आळा बसलो. स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडून तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आणि पुढील पिढ्यांचे आयुष्य धोक्यात आहे हे त्याच्या वारंवार लक्षात आणून देऊनही ‘कोण लक्षात घेतो?’ अशीच सर्वत्र स्थिती आहे.

माणूस सृष्टीच्या, निसर्गाच्या हातात हात घालून चालेल, त्याची व्यवस्थित काळजी घेईल, त्याची आस्थापूर्वक निगराणी करेल तर माणसाचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचण्याची शक्यता. म्हणून आजच्या काळात श्रावणाचे महत्त्व जाणण्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी घालून दिलेला श्रावणाचा दंडक आहे, त्यामुळे ‘श्रावण पाळणे’ असा संकेत रूढ झाला. माणसाची खाण्यापिण्याची, वासनेची, वखवखलेपणाची नस ओळखून त्यावर प्रतिबंधक लस टोचण्याची रीत आपल्या ‘श्रावण पाळण्या’च्या पारंपरिक पद्धतीत आहे. ज्यामध्ये निसर्गाशी एकरूप, एकतान झालेली परस्परांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आदर, प्रेम, कृतज्ञता, जिव्हाळा असलेली ही माणसे होती. ‘आरोग्य हीच जगण्याची गुरुकिल्ली’ आणि तीच धनसंपदा जपण्यासाठी श्रावणात उगवणाऱ्या नैसर्गिक भाज्याफळे, खाद्यपेये यांच्या सेवनावर त्यांनी भर दिला. ऋतूयोग्य असा आहार ठरविला आणि उपवासाचे सामर्थ्य दाखविले. शरीरस्वास्थ्य असले की मनःस्वास्थ्य आपोआप प्राप्त होते. प्रसन्न, आनंदी, समाधानी जगण्यात फार मोठा अर्थ आणि आनंद असतो आणि तो सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असतो, हा विश्वास ठेवून त्यांनी सणवारांची योजना केली. श्रावणाचा एक महिना तरी सर्वप्रकारचा संयम बाळगण्यास शिकविले. रस-रूप-रंग-गंधाचा आस्वाद घेत श्रावणी सृष्टी वाढविण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची!