आर्सेनलने जिंकला ‘एफए कप’

0
164

एमेरिक ऑबामेयांग याने केलेल्या दोन गोलच्या बळावर आर्सेनलने चेल्सीचा २-१ असा पराभव करत एफए करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचे हे १४ वे विजेतेपद ठरले.
सामन्याची सुरुवात आर्सेनलसाठी भयावह झाली. स्थिरावण्यापूर्वीच त्यांना एका गोलने पिछाडीवर व्हावे लागले. चेल्सीच्या ख्रिस्तियन पुलीसीस याने ५ व्या मिनिटालाच आर्सेनलचा बचाव भेदत संघाला १-० असे पुढे नेले. पहिल्या पाच मिनिटांत ०-१ असे पिछाडीवर पडलेल्या आर्सेनलने आपली जिद्द सोडली नाही.

एमेरिक ऑबामेयांग याने २३ व्या मिनिटाला गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली. यानंतरही दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र, दोन्ही संघांचा बचाव अप्रतिम होता. मध्यंतरापर्यंत उभय संघ १-१ असे बरोबरीत होते. दुसरे सत्र सुरू झाल्यावर आर्सेनलने चेल्सीच्या खेळाडूंवर दबाव ठेवण्यात यश मिळवले. ६७ व्या मिनिटाला एमेरिक ऑबामेयांगने आणखी एक गोल केला व संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर चेल्सीने बरोबरीचे प्रयत्न केेले. परंतु, आर्सेनलचा बचाव त्यांना भेदता आला नाही व पराभव स्वीकारावा लागला. कोरोनाचा धोका मार्चपासून सुरू झाल्याने स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. हा धोका कमी झाल्यावर काही निर्बंधांचे पालन करत स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी मात्र जगप्रसिद्ध विम्बली मैदानावर मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थित हा सामना झाला. या विजेतेपदासह आर्सेनलने युएफा युरोप लीग स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचीही कामगिरी केली.