आरोग्य निर्देशांक क्रमवारीमध्ये गोव्याची चौथ्या स्थानी घसरण

0
25

नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकात गोव्याची घसरण झाली आहे. छोट्या राज्यांच्या विभागात यापूर्वी गोवा दुसर्‍या स्थानावर होता. आता नव्याने जारी करण्यात आलेल्या क्रमवारीत गोवा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. नीती आयोगाने सोमवारी आरोग्य निर्देशांक जारी केला. त्यात मोठ्या राज्यांमध्ये केरळने पहिले स्थान पटकावले, तर छोट्या राज्यांमध्ये मिझोरामने पहिला स्थानमिळवले आहे.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाने तयार केलेल्या आरोग्य निर्देशांकाच्या चौथ्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. हा अहवाल तयार करताना सन २०१९-२० दरम्यानच्या कामगिरीचा विचार करण्यात आला. त्यासाठी ४ फेर्‍यांमध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार गुण देण्यात आले आहेत. मोठ्या राज्यांमध्ये केरळनंतर तामिळनाडू, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची परिस्थिती सर्वात खराब असून, त्याला शेवटचे स्थान मिळाले आहे.

छोट्या राज्यांमध्ये मिझोरामनंतर मणिपूर, मिझोराम यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर चौथे स्थान गोव्याला मिळाले आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादरा नगर हवेली पहिल्या क्रमांकावर आहे, तर चंदीगढ हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.