>> गोमेकॉतील डॉ. मंजुनाथ देसाई यांचे कर्करोगाने निधन
शिरशिरे-बोरी गावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ प्रेमानंद देसाई (४४) यांचे काल रविवारी पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, भावजय व इतर परिवार आहे. त्यांना कर्करोग झाल्याने ते काही दिवस आजारी होते. कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज आज अपयशी ठरली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ते हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
डॉ. मंजुनाथ देसाई हे आपल्या कुटुंबासमवेत मिरामार-पणजी येथे राहत होते. परंतु त्यांचा कर्करोगाचा आजार वाढल्याने ते आपल्या मूळ गावी म्हणजे शिरशिरे-बोरी येथील घरी रहायला आले होते. कर्करोगाशी सामना देत असतानाच पहाटे त्यांचे निधन झाले. आरोग्य क्षेत्रात इतरांना जीवदान देणारा ‘देवदूत’ अचानक हरपला, अशा प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर व्यक्त करण्यात आल्या. दुपारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू नवनाथ देसाई यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला.
त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वीजमंत्री नीलेश काब्राल, आमदार रवी नाईक, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड, केंद्रीय जहाजोद्योग व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर तसेच नवदुर्गा संस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभुदेसाई, दिलीपकुमार देवारी, प्रा. मीनानाथ उपाध्ये, माजी मंत्री महादेव नाईक, इस्पितळातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच इतर मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.
बंगलोर, पॉंडिचेरीतही दिली सेवा
मंजुनाथ देसाई यांचे प्राथमिक शिक्षण शिरशिरे-बोरी येथील प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद विद्यालय व पुढील शिक्षण काणकोण येथील नवोदय विद्यालयात घेतले. विज्ञान शाखेत शिकणार्या मंजुनाथ देसाई यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळाला. बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिली. त्यांनी बंगलोर, पॉंडिचेरी येथेही वैद्यकीय सेवा दिली. हृदयरोगासंबंधी उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि हृदयरोगासंबंधीचे एक उत्कृष्ट शल्यविशारद म्हणून त्यांना मान्यता मिळाली. सध्या ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
पर्रीकरांनी स्वगृही आणले
माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी इस्पितळ बनवण्यासाठी आणि खास करून हृदयरोगासंबंधीचे रुग्ण वाढल्याने प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व शल्यविशारद डॉ. मंजुनाथ देसाई यांना गोमेकॉत सेवेसाठी निमंत्रण दिले आणि डॉ. देसाई यांनी ते लगेच स्वीकारले. आपल्या राज्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी आपल्या सेवेची जर गरज असेल तर आपण गोव्यात वैद्यकीय सेवा द्यायला तयार असल्याचे त्यांनी कळवले आणि बांबोळी इस्पितळात त्यांनी सेवा देण्यास प्रारंभ केला. तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंजुनाथ देसाई यांना स्वगृही आणल्यानंतर त्याचा फायदा राज्याला झाला.
शेकडो परिवारात दुःखात बुडाले
डॉ. देसाई यांनी बांबोळी इस्पितळातील आपल्या कार्यकाळात हृदयरोगासंबंधी शेकडो शस्त्रक्रिया केल्या. डॉ. देसाई हे रुग्णावर उपचार करत आहेत, असे समजले की नातेवाईक निश्चिंत असायचे, अशा प्रतिक्रिया रुग्ण व त्याच्या नातेवाइकांकडून ऐकायला मिळायच्या. शेकडो लोकांना डॉ. मंजुनाथ यांनी जीवदान दिले. एकापरीने अनेक रुग्णांचे देवदूत बनलेले डॉ. मंजुनाथ मात्र अल्पवयातच निघून गेल्याने शेकडो रुग्ण व त्यांचे परिवार दुःखात बुडाले आहेत.