आयुष्यभर अग्निपथावरून चाललेले नेताजी

0
130

– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली
वसाहतवादी हेतूने इंग्रजांनी भारतावर जे पारतंत्र्य लादले होते, ते सर्वस्वी नाकारण्याचे आणि भारतीयांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे ऐतिहासिक कार्य ज्या महामानवांनी केले, त्यात सुभाषचंद्र बोस यांचे स्थान अग्रस्थानी आहे. महात्मा गांधींनी त्यांचा उल्लेख ‘देशभक्त’ असा मोठ्या गौरवाने केला होता, मात्र सुभाषबाबूंची स्वातंत्र्यलढ्याची कल्पना मुळातच गांधींच्या धोरणापेक्षा वेगळी म्हणजे सशस्त्र क्रांतीची होती.१५ वर्षांचे असताना सुभाषबाबूंनी विवेकानंद आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास केला. पण विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्या अंगात जणू विजेची लहर कंपन पावत होती. विद्यार्थी दशेत इंग्लंडच्या राणीचे गुणगान करणारी प्रार्थना म्हणायला साफ नकार दिल्याने त्यांंना शाळेच्या मुख्याध्यापकांनी फोडून काढले होते, तसेच ब्रिटीश साम्राज्याचे राजे पंचम जॉर्ज हिंदुस्थानच्या भेटीवर आले तेव्हा अनेक हिंदू संस्थानिक लाचारीचा भाव आणून सम्राटाच्या पायावर लोटांगण घालत होते. हे पाहून ते संतप्त होत असत.
कुशाग्र बुद्धिमत्ता, असामान्य धैर्य, संघटनाचातुर्य, अमोघ वक्तृत्व अशा गुणांचे वरदान लाभलेल्या सुभाषचंद्रांनी लंडनला जाऊन कठीण समजला जाणारा आय.सी.एस. चा अभ्यास पूर्ण केला. देशासाठी सर्वस्व अर्पण करून साधी राहणी अंगिकारणार्‍या देशबंधू चित्तरंजनदासांना त्यांनी आपले राजकीय गुरू मानले आणि त्यांच्या प्रेरणेने ते राजकारणात ओढले गेले.
महात्मा गांधींनी असहकाराची भूमिका घेऊन कॉंग्रेस पक्षाला प्रभावशील आणि अहिंसक रीतीने कार्य करणारी संघटना म्हणून प्रस्थापित केली. तेव्हा स्वतः गांधींनी सुभाषबाबूंना स्वराज्य पक्षाचे संस्थापक चित्तरंजन दासांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा सल्ला दिला. तेथे सुभाषबाबू युवकांचे मार्गदर्शक, बंगाल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे सर्वेसर्वा बनले. सुभाषबाबूंनी कलकत्त्याचे व्यवस्थापन अधिकारी म्हणून काम करताना शहराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कामकाजाने जनता खूष होत होती आणि त्यांचा जनतेशी संपर्कही वाढत होता. सुभाषबाबूंची ही वाढती लोकसंख्या ब्रिटीश अधिकार्‍यांच्या डोळ्यांत खूपू लागल्याने त्यांनी कोणताही पुरावा नसताना त्यांना तुरुंगात पाठविले. तुरुंगात त्यांनी धर्मशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र वगैरे विषयांचे वाचन केले. तिथेच त्यांना क्षयाचा विकार जडला. पुढे महात्मा गांधींची त्यांचे अनेक मतभेद झाले. परंतु उभयतांत परस्पर प्रेम आणि आदर सतत होता. त्यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी बहाल केली. त्या उलट महात्माजी सुभाष हा माझा ‘वांड’ (वाट चुकलेला) मुलगा असे मिश्किलपणे म्हणत.
मुजोर ब्रिटीश सरकार असहकार, बहिष्कार आणि सारा बंदी सारख्या कार्यक्रमांनी बधतील का? गांधींजींच्या अशा मिळमिळीत धोरणाने स्वातंत्र्य मिळेल का? असा प्रश्‍न सुभाषबाबूंना पडे. कॉंग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली. मात्र त्यांचे गांधींची मतभेद झाल्यामुळे त्यांचा मनोभंग झाला. कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष स्थापन केला.
सशस्त्र क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे १९३२ मध्ये सुभाषना हद्दपार करण्यात आले. तेव्हा त्यांनी व्हिएन्नात राहून युरोपच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. फॅसिझम आणि साम्यवाद या दोन्हींतील उपयुक्त गोष्टी एकत्र आणून नवी विचारप्रणाली अनुसरावी असे मत बनले. या काळात भारतात परतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या जहाल भूमिकेमुळे आणि त्यांना मिळणार्‍या पाठिंब्यामुळे ब्रिटीश सरकार हादरले आणि त्यांना त्यांच्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवले. तेथून वेशांतर करून ते पेशावरमार्गे काबूलला गेले. हे नाट्यमय पलायन त्यांनी शिवाजी महाराजांच्या ‘आगर्‍याहून सुटका’ या ऐतिहासिक घटनेने प्रेरित होऊन केले होते.
जगातही ब्रिटिशांची शत्रूराष्ट्रे होती. त्यांची मदत मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारताच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. त्यासाठी त्यांनी रासबिहारी घोष यांच्या मदतीने जर्मनीहून जपानला पोहोचण्यासाठी एका पाणबुडीतून सुमारे तीन महिने प्रवास केला. त्यांनी जर्मनी, इंग्लंड, जपानला भेटी देऊन हिटलर, मुसोलिनी यांना मदत करण्यास प्रवृत्त केले. १९४३ साली सिंगापूर येथे ‘आझाद हिंद’ या प्रति सरकाराची स्थापना केली. सुभाषबाबूंनी स्वतःला त्या सरकारचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि सरसेनापती घोषित केले. या सरकारने इंग्लंड – अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा करून स्वतःचे तिकीट आणि नोटाही छापल्या. यातूनच पुढे ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असे आव्हान करून देशातील तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक हात पुढे आले. स्त्रियांनी आपल्या गळ्यातील दागिने काढून दान केले, तर काहींनी सढळ हाताने रोख पैसा, धनादेश अर्पण केले. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या नेतृत्वाखाली महिलांची पलटण तयार झाली. त्या पलटणीच्या सैनिकांना ‘राण्या’ असे म्हणत. जपान व सिंगापूर येथे कैद करून ठेवलेले ब्रिटिशांचे सुमारे ४५,००० सैनिक सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेत सामील करून घेतले. सुभाषबाबूंनी सैन्यात कार्यरत असे तीन विभाग केले. त्या प्रत्येक विभागात १० हजार सैनिक,२० हजार स्वयंसेवक होते. चलो दिल्लीचा नारा देत सेनेने आगेकूच केली. मात्र दुसर्‍या महायुद्धात जपानच्या पाडावानंतर त्यांनी जपानच्या मदतीशिवाय हट्टाने आगेकूच केली. खरी, परंतु बंगालच्या महासागरापासून सुमारे २०० मैल अंतरावर अनेक आपत्तीना तोंड देत त्यांना अखेर माघार घ्यावी लागली. जपानने शरणागती पत्करल्यामुळे लष्करी मदत आणि रसद थांबली. उपासमार, हिंवताप, भयंकर पाऊस आणि अन्य रोगांनी हजारो सैनिक मृत्यूमुखी पडले. राहिलेल्यांना ब्रिटिशांनी युद्धकैदी म्हणून पकडले आणि लाल किल्ल्यावर खटला चालवला. पुढे नेताजी सुभाष विमान अपघातात मृत्यू पावले. पण त्यांच्या मृत्यूवरही अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आज ७० वर्षांनंतरही त्याबद्दलचे गूढ कायम राहिले आहे.
त्यांच्या निर्भय नि झुंजार वृत्तीमुळे कणखर कृती आणि अपार त्यागामुळे भारतीयांच्या मनात त्यांचे ‘नेताजी’ हे रूप कायम ठसले. ज्या सुभाषबाबूंना स्वतः गांधींनी ‘द प्रिन्स अमंग पेट्रीअट्‌स’ असे संबोधले त्या सुभाषबाबूंची मात्र पुढे कॉंग्रेसने म्हणावी तितकी दखल घेतली नाही. सुभाषचंद्र बोस नावाचे ‘वादळी पर्व’ भारतीय इतिहासात चिरस्मरणीय राहिले. स्वतः अग्निपथावरून चालत भस्मसात झाले. नेताजींचे सारे आयुष्य म्हणजे अनेक रोमांचक आणि नाट्यमय घटनांनी भरलेला भव्य असा जीवनपट आहे. देशातीलच नव्हे, तर एकूण जगातील क्रांतिकारकांत कोहिनूर हिर्‍यासारखे सुभाषबाबू चमकत राहिले. एखाद्याला स्वदेशाविषयी असलेले प्रचंड प्रेम आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी एखादी व्यक्ती कसलाही त्याग करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्यदेवीच्या यज्ञवेदीवर आपले बलिदान देऊन ते अमर झाले.