आयसीसी विश्व करंडक

0
10

टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणार?

  • सुधाकर रामचंद्र नाईक

‘आयसीसी वर्ल्ड कप’ क्रिकेट स्पर्धेचा थरार गेल्या गुरुवारपासून सुरू झाला असून क्रिकेट विश्वातील तमाम क्रिकेटरसिकांना पुढील दीडेक महिना थरारक, उत्कंठावर्धंक, रोमांचकारी क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. दहा देशांत अजिंक्यपदासाठी हे मुकाबले रंगतील. संघाचा बहर, स्वभूमी, स्वमैदान अशा एकंदर अनुकूलतेत भारतीय संघ निश्चितच ‘हॉट फेव्हरीट’ आहे आणि येत्या 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील भव्यदिव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया तिसऱ्यांदा आयसीसी विश्व करंडकावर नाव कोरील अशी अपेक्षा आहे.

‘आयसीसी वर्ल्ड कप’ क्रिकेट स्पर्धेचा थरार गेल्या गुरुवारपासून सुरू झालेला असून क्रिकेट विश्वातील तमाम क्रिकेटरसिकांना पुढील दीडेक महिना थरारक, उत्कंठावर्धंक, रोमांचकारी क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, पुणे, मुंबई, धरमशाला, लखनौ, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळूर या भारतातील दहा प्रमुख शहरांत हा जागतिक क्रिकेटचा थरार रंगणार आहे. गतविजेता इंग्लंड, उपविजेता न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि यजमान भारत या दहा देशांत अजिंक्यपदासाठी ‘राउंड रॉबिन लीग’ पद्धतीचे चुरशीचे मुकाबले रंगतील.
1987, 1996, 2011 असे याआधी तीन वेळा- आशियाई शेजारी देशांसमवेत- संयुक्त यजमानपद भूषविलेला भारत यंदा प्रथमच एकमेव आशियाई यजमान असून अजिंक्यपदाचा प्रबळ दावेदार म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. 1983 मध्ये ‘कपिल डेविल्स’च्या वीरोचित मर्दुमकीवर इंग्लंडमध्ये विश्वचषकावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम नोंदलेल्या भारताने 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली स्वगृही दुसऱ्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळविला होता; आणि यंदा रोहित शर्मा आणि कंपनीला तिसऱ्यांदा जेतेपद प्राप्त करण्याची सुवर्णसंधी आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेचे अजिंक्यपद तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वन-डे मालिका जिंकलेला भारतीय संघ स्वगृहीच्या अनुकूलतेत ‘टॉप फेव्हरीट’ मानला जातो; पण गेल्या दशकभराच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यात असफल ठरलेला भारतीय संघ स्वगृहीच्या अनुकूलतेचा फायदा कितपत उठविण्यात यशस्वी ठरतो यावर यजमानांचे तिसऱ्या अजिंक्यपदाचे भवितव्य अवलंबून असेल.
2007 मध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आदींसह प्रमुख अग्रणी खेळाडूंच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील युवा दमाच्या ‘टीम इंडिया’ने शुभारंभी आयसीसी टी-20 विश्वचषकावर सर्वप्रथम नाव नोंदण्याचा अजोड पराक्रम नोंदला होता. चार वर्षांनंतर 2011 मध्ये स्वगृही आयसीसी विश्वचषक दुसऱ्यांदा जिंकण्याची किमयाही ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याच आधिपत्याखाली केली होती आणि 2013 मध्ये माहीने टीम इंडियाला तिसरे आयसीसी अजिंक्यपद मिळवून देताना आयसीसी चँपियन्स चषक जिंकला होता. पण त्यानंतर गेल्या दशकभरात मात्र भारतीय संघ आयसीसी प्रतियोगितांत असफल ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी आयसीसी विश्वचषकाचे तेरावे पर्व अत्यंत महत्त्वाचे आहे आणि स्वगृहीच्या अनुकूलतेत रोहित शर्मा आणि कंपनी या संधीचे सोने करील अशी आशा आहे.

मूळ कार्यक्रम पत्रिकेनुसार चार वर्षांनी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेटचा हा तेरावा महाकुंभ 9 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 या कालावधीत होणार होता, पण ‘कोविड-19’च्या महामारीमुळे जुलै 2020 मध्ये ‘आयसीसी’ने वेळापत्रकात बदल करून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 असा स्पर्धेचा कालावधी निश्चित केला.

स्वगृहीच्या अनुकूलतेत विश्व क्रमांक एकवर विराजमान असलेल्या यजमान भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात असले तरी तिसऱ्यांदा विश्व विजेतेपदाचा बहुमान पटकावण्यासाठी रोहित आणि कंपनीला प्रबळ प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानांचा बिमोड करावा लागणार आहे.
विद्यमान विश्वचषकातील दहा संघांचा आढावा घेतल्यास पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्‌‍स या तीन सघांविरुद्धची भारताची विश्वचषक कामगिरी शंभर टक्के यशदायी आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारताने या तीन संघांविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. अन्य प्रतिस्पर्ध्यांकडून मात्र पराभवांचे धक्के स्वीकारावे लागले आहेत.

ऑस्ट्रेलिया
पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून भारताला बऱ्याचदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. कांगारूंविरुद्ध आतापर्यंत भारताला केवळ चार विश्वचषक सामने जिंकता आले. 1983, 1987, 2011 आणि 2019 या प्रतियोगितांत चार वेळा भारताने ऑसिसविरुद्ध विजय मिळविले. भारत आणि ऑसिसमध्ये 2003 मध्ये विश्वचषक अंतिम सामना आणि 2015 मध्ये उपांत्य सामना रंगला होता आणि दोन्ही वेळा पाच वेळच्या विजेत्यांनी बाजी मारली होती. 2011 मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारतासाठी संस्मरणीय ठरावा, कारण उपउपांत्य फेरीतील या विजयानंतर भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवून दुसऱ्यांदा विश्व विजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील विद्यमान प्रतियोगितेतील पहिला मुकाबला आज दि. 8 रोजी चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

अफगाणिस्तान
नव्या दमाच्या अफगाणिस्तानविरुद्ध विश्वचषकात भारत केवळ एक सामना खेळलेला आहे. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या 12 व्या विश्वचषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी निसटता विजय मिळविला होता. अफगाणिस्तानने भारतावर प्रचंड दणपण आणले होते, पण अखेर द्रुतगती मोहम्मद शामीने प्रभावी गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटवीत भारताला विजय मिळवून दिला. विद्यमान प्रतियोगितेतील भारत आणि अफगाणिस्तानमधील मुकाबला 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे.

पाकिस्तान
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताची विश्वचषक कामगिरी अजेय, शानदार आहे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजयी दौड जारी राखलेली असून, नुकत्याच झालेल्या आशिया चषकातील दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर, यावेळीही ती अबाधित राहील अशी अपेक्षा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध सातही सामन्यांत दणदणीत विजय मिळविलेले आहेत. 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या सातही विश्वचषकांत भारताने पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळविलेले आहेत. विद्यमान प्रतियोगितेत भारत आणि पाकिस्तानमधील लढत येत्या दि. 14 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल.

बांगलादेश
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत चार विश्वचषक सामने रंगले आहेत. भारताने तीन विजय मिळविले तर बांगलादेशला एका सामन्यात यश आले. 2007 मधील विश्वचषकात बांगलादेशने भारतावर सनसनाटी विजय मिळविला होता. त्यानंतर 2011, 2015 आणि 2019 या चारही प्रतियोगितांत भारताने बांगलादेशला हरविले होते. विद्यमान प्रतियोगितेत भारत आणि बांगलादेशमधील मुकाबला 19 ऑक्टोबरला पुणे येथे होणार आहे.

न्यूझीलंड
न्यूझीलंडने विश्वचषकात भारताला बरेच जबर धक्क दिले आहेत. उभयतांमधील आतापर्यंतच्या नऊ सामन्यांत भारताला केवळ तीन विजय मिळविता आले, तर पाच सामन्यांत पराभवाचे धक्के खावे लागले. एक सामना पावसाने उधळला. भारताने न्यूझीलंडविरुद्ध 2003 मध्ये एक आणि 1987 मध्ये दोन विजय मिळविले होते. 1975, 1979, 1992, 1999 आणि 2019 या विश्वचषकातील पाच सामन्यांत भारताला किविजने पराभवाचे धक्के दिले. 2019 मधील उभयतांतील एक सामना पावसाने उधळविला होता, तर उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दमदार विजयासह भारताला स्पर्धेंबाहेर फेकले होते. विद्यमान प्रतियोगितेत 22 ऑक्टोबर रोजी ‘धरमशाला’ येथे भारत वि. न्यूझीलंड मुकाबला होईल.

इंग्लंड
आयसीसी विश्वचषकात भारताची इंग्लंडविरुद्धची कामगिरी काही विशेष चमकदार ठरलेली नाही. उभयतांमधील आतापर्यंतच्या आठ सामन्यांत भारताला केवळ तीन विजय मिळविता आले, तर चार सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली. एक सामना ‘टाय’ ठरला! 1983, 1999 आणि 2003 मध्ये भारताने इंग्लंडला हरविले, पण गेल्या दोन दशकांत मात्र पराभवांची मालिका जारी आहे. 2011 मध्ये उभयतांमधील सामना ‘टाय’ झाला आणि त्यानंतर 2019 मध्ये भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. 2007 आणि 2015 मध्ये उभय संघ आमने-सामने ठाकले नाहीत. उभयतांमधील विद्यमान प्रतियोगितेतील मुकाबला 29 ऑक्टोबर रोजी लखनौ येथे रंगेल.
श्रीलंका
भारत आणि श्रीलंका यांच्यामधील विश्वचषक कामगिरी समसमान राहिली आहे. उभय संघ या क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यात नऊ वेळा आमने-सामने ठाकले. उभय संघांनी प्रत्येकी चार विजय मिळविले तर एक सामना अनिकाली ठरला. 1999, 2003, 2011 आणि 2019 मध्ये भारताने विजय मिळविले, तर 1979, 1996 (दोन सामने) आणि 2007 मध्ये श्रीलंकेने बाजी मारली. 1997 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेली उपांत्य लढत प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे अर्ध्यावर सोडून देण्यात आली, पण आयोजकांनी नंतर श्रीलंकेला विजयी घोषित केले. 2007 मधील गट फेरीतील भारताला श्रीलंकेकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. तथापि, 2011 मध्ये भारताने त्याचा वचपा घेत श्रीलंकेला हरवून दुसऱ्यांदा विश्वचषक अजिंक्यपदाचा बहुमान मिळविला होता. विद्यमान प्रतियोगितेतील भारत-श्रीलंका सामना 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

दक्षिण आफ्रिका
भारत आणि द. आफ्रिका यांत 1992 ते 2019 या विश्वचषकादरम्यात पाच सामने झाले आहेत. द. आफ्रिकेने तीन विजय मिळविले, तर भारताला केवळ दोनच सामने जिंकता आले. 1992, 1999 आणि 2011 या चार प्रतियोगितांत द. आफ्रिकने विजय मिळविले, तर भारताने 2015 आणि 2019 या गेल्या दोन विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदले. विद्यमान प्रतियोगितेत भारत वि. द. आफ्रिका लढत 5 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होईल.

नेदरलँड्स
भारताने नेदरलँड्सविरुद्धचे आपले दोन्ही विश्वचषक सामने जिंकलेले आहेत. 2003 आणि 2011 मधील सामन्यात भारताने नेदरलँड्सवर लिलया मात केलेली आहे. उभयतांमधील साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळूर येथे होईल.
विद्यमान प्रतियोगिता ‘राऊंड रॉबिन फॉर्मेट’मध्ये खेळविण्यात येत असून या पद्धतीने खेळविल्या गेलेल्या दोन्ही महाकुंभात भारतीय संघ असफल ठरला होता. 1992 मध्ये मोहम्मद अझरूद्दिनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. केवळ दोनच विजय मिळविण्यात यश आले. 6 सामन्यांत पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. 2019 मध्ये परत एकदा ‘राऊंड रॉबिन फॉर्मेट’चा अवलंब झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरी गाठली, पण तेथे न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे विद्यमान प्रतियोगितेत रोहित शर्मा आणि कंपनीला सावधपणे तथा निर्धारपूर्वक आगेकूच करावी लागेल.

विद्यमान भारतीय संघ समतोल असून गेल्या दीड-दोन वर्षांच्या कालखंडात संघ-सूत्रधार, व्यवस्थापनाने उत्तम संघरचना साधलेली आहे. अनुभवी रोहित शर्माच्या साथीला नव्या दमाचा शुभमन गिल सलामीवीर साथी आहे. विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहे. के. एल. राहुल आणि श्रेयश अय्यर यांनी आपण लय साधल्याचे दर्शविलेले आहे. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवनेही आपली बेधडक, बेदरकार गुणवत्ता दर्शविलेली आहे. उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि अजय जडेजा यांनी आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. पुनरागमनातील जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सीराज या द्रूतगतींनीही आपले नाणे खणखणीत असल्याचे दर्शविले असून ‘चायनामॅन’ कुलदीप यादवच्या साथीला अनुभवी रविचंद्रन अश्विनच्या पुनरागमनाने फिरकीची जादू बळकट बनलेली आहे. संघाचा बहर, स्वभूमी, स्वमैदान अशा एकंदर अनुकूलतेत भारतीय संघ निश्चितच ‘हॉट फेव्हरीट’ आहे आणि येत्या 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील भव्यदिव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया तिसऱ्यांदा आयसीसी विश्व करंडकावर नाव कोरील अशी आशा आहे.

चौकट
भारताच्या विश्वचषक साखळी लढती
08 ऑक्टोबर : भारत वि. ऑस्ट्रेलिया
11 ऑक्टोबर : भारत वि. अफगाणिस्तान
14 ऑक्टोबर : भारत वि. पाकिस्तान
19 ऑक्टोबर : भारत वि. बांगलादेश
22 ऑक्टोबर : भारत वि. न्यूझीलंड
29 ऑक्टोबर : भारत वि. इंग्लंड
02 नोव्हेंबर : भारत वि. श्रीलंका
05 नोंव्हेंबर : भारत वि. द. आफ्रिका
12 नोव्हेंबर : भारत वि. नेदरँड्‌‍स

चौकट
तीन नवे नियम

  • 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद रंगला होता. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होते. त्यातही बरोबरी झाली तर चौकारांच्या आधारावर विजेता घोषित केला जातो. याच नियमामुळे इंग्लंडला जेतेपद मिळाले होते. मात्र हा नियम बदलला असून आता विजयी निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाणार आहे.
  • मैदानावरील पंचांचा सॉफ्ट सिग्नल संपुष्टात आला आहे. मैदानातील पंचांना तिसऱ्या पंचांना विचारण्यापूर्वी आधी त्यांचा निर्णय द्यावा लागत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय कधीकधी जवळपास असला तरी मैदानातील पंचाच्या बाजूने जायचा. आऊट असो की नसो मैदानातील पंचांच्या पक्षात निर्णय घेतला जायचा. पण आता हा सॉफ्ट सिग्नल नियम संपुष्टात आला आहे. जर तिसरा पंच बाद की नाबाद ठरवण्यात अपयशी ठरला तरच मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
  • वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने आणखी एक नियम जोडला आहे. स्पर्धेतील एकाही स्टेडियमची बाउंड्री 70 मीटरपेक्षा कमी नसेल. काही ठिकाणी सीमारेषा जवळ असल्याने फलंदाज आरामात चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. हे लक्षात घेऊनच हा नियम तयार केला आहे.