‘आयपॅक’ने उमेदवारांना वार्‍यावर सोडले

0
26

>> तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांचा आरोप

तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर व त्यांच्या ‘आयपॅक’ने पक्षाच्या उमेदवारांना वार्‍यावर सोडल्याचा आरोप तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी काल केला.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर व त्यांची आयपॅक संस्था ज्या प्रकारे राज्यातील तृणमूलचे उमेदवार व कार्यकर्त्यांशी वागत आहेत, त्याबद्दल सगळेच नाराज आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी आपणाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा सल्ला दिला होता; मात्र आपण अजून तो सल्ला मान्य केलेला नसून, तूर्त प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यास नकार दिल्याचे किरण कांदोळकर यांनी स्पष्ट केले.

१४ फेब्रुवारी रोजी राज्यात मतदान झाल्यानंतर प्रशांत किशोर व आयपॅकने उमेदवारांना पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिले आहे. असे असले तरी आपण तृणमूल कॉंग्रेस पक्ष सोडणार नाही, असे स्पष्ट करून कांदोळकर यांनी पक्षाचे उमेदवार आयपॅकवर नाराज आहेत, ही बाब तितकीच खरी असल्याचे त्यांनी सांगितले.

तृणमूलला ६ ते ७ जागा मिळणार
आपण सध्या तरी तृणमूलच्या प्रदेशाध्यक्षपदी आहे. आपण पक्षाचे कार्य पुढे नेणार आहे. काल आपण तृणमूलच्या उमेदवारांसोबत बैठक घेऊन निकालाबाबत चर्चा केली. तसेच उमेदवारांचा निवडणूक अनुभव व विजयाबाबत चर्चा केली. या निवडणुकीत तृणमूलचे ६ ते ७ उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास किरण कांदोळकर यांनी व्यक्त केला. तसेच तृणमूल-मगो युतीला जवळपास १२ जागा मिळतील, असेही ते म्हणाले.