आयपीओ… आयपीओ… आयपीओ….आयपीओंची चलती

0
11
  • शशांक मो. गुळगुळे

सध्या एकापाठोपाठ एक असा ‘आयपीओं’चा सपाटा सुरू आहे. येत्या काळातही विक्री सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘आयपीओ’त गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांतील मुदत-ठेवींवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा बराच जास्त परतावा मिळत आहे.

सध्या एकापाठोपाठ एक असा प्राथमिक समभाग विक्रीचा म्हणजे ‘आयपीओं’चा सपाटा सुरू आहे. येत्या काळातही ‘आयपीओं’ची विक्री सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ‘आयपीओ’त गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांतील मुदत-ठेवींवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा बराच जास्त परतावा मिळत आहे. एकामागून एक येणारे ‘आयपीओ’ पाहून बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांनाही ‘आयपीओ’त गुंतवणूक करावीशी वाटत आहे. त्यांच्या माहितीसाठी ‘आयपीओ’ला अर्ज करण्याचे पर्याय येथे देत आहोत-

अनेक बँकांत बचत खाते, ट्रेडिंग व डी-मॅट खाते एकत्र उघडण्याची सुविधा असते. यातून ऑनलाईन अर्ज करता येतो. डिस्काऊंट ब्रोकर, तसेच ऑनलाईन ब्रोकर आपल्या पोर्टलवर अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देतात. राष्ट्रीय शेअर बाजार/ मुंबई शेअर बाजारवर ‘आयपीओ’ अर्ज उपलब्ध असतात. त्यांची प्रिंट काढून, त्यात आवश्यक माहिती भरून ‘ओएसबीए’ सोय देणाऱ्या बँकेत अर्ज करू शकता. स्थानिक ब्रोकरकडे जर त्याचे डी-मॅट खाते असेल व त्याला गुंतवणूकदाराने त्याचा यूपीआय आयडी दिला तर ब्रोकर परस्पर ऑनलाईन अर्ज भरू शकतो. जे गुंतवणूकदार इंटरनेट बँकिंग वापरतात ते तेथे लॉग-इन करून ‘आयपीओ’साठी अर्ज करू शकतात. ॲक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक, पीएनबी, एसबीआय अशा अनेक बँकांत ही सोय आहे.

‘आयपीओ’च्या गुंतवणुकीतून नफा मिळवायचा असेल तर काही प्राथमिक बाबी तपासून घेतल्या पाहिजेत. ‘आयपीओ’ आणत असलेल्या कंपनीचे आधीच बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांपेक्षा काही वेगळेपण आहे का? बाहेरून पैसा गोळा करण्यात कंपनीचा अंतस्थ हेतू काय आहे? प्रवर्तकांची या भांडवलावर अधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे का? मागील चार-पाच वर्षे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे? गुंतवणूकदाराने शेअरसाठी अर्ज केल्यापासून नोंदणीपर्यंत बाजार खूप पडला आणि शेअर खालच्या भावाला नोंदला गेला तर पुढील वर्षे तो शेअर ‘होल्ड’ करता येईल का? व ‘होल्ड’ करण्याची क्षमता असेल तरच गुंतवणूक करावी. ‘आयपीओ’ला अर्ज केला आणि त्याला बरेचपट मागणी आली तर शेअर वाट्याला कमी येणार, याचा परताव्यावर काय परिणाम होईल याचा विचार अगोदर करावा. मागील काही वर्षांत गुंतवणूकदार अनेक कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीतून मालामाल झाले. कारण 8-10 दिवसांत त्यांच्या गुंतवणुकीवर 30-40 टक्के परतावा मिळत आहे.

‘आयपीओ’मध्ये ॲलोटमेंट (शेअर वाटप प्रक्रिया) कशी असते ही पद्धती समजली तर ‘आयपीओ’त शेअरसाठी अर्ज कसा करावा हे समजणे सोपे जाते. कंपनीने ऑफर केलेल्या शेअरपेक्षा अधिक शेअरसाठी अर्ज आले तर आधी प्रत्येक गुंतवणूकदाराला शक्य असल्यास प्रत्येकी एक लॉट दिला जातो. पण हे करणे जर शक्य नसेल तर बहुधा लॉटरी पद्धतीने वाटप केले जाते. त्यामुळे नक्की कोणाला शेअर वाटप होईल हे समजणे अवघड जाते. यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांनी फक्त एकाच्या नावावर अर्ज करण्यापेक्षा कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्यांच्या नावावर अर्ज केले तर शेअरवाटप होण्याची शक्यता अधिक असते.

कोणत्या चुका टाळाव्यात? बऱ्याचदा एका व्यक्तीची अनेक डी-मॅट खाती असतात. त्यामुळे ‘आयपीओ’ला अर्ज करताना सर्व खात्यांमधून अर्ज केला जातो. परंतु व्यक्तीचा ‘पॅन’ एकच असल्यामुळे अर्ज आल्याआल्याच तो रजिस्ट्रारकडून नाकारला जातो. त्यामुळे कधीही अर्ज करायचा झाल्यास एका व्यक्तीने एकच अर्ज करावा.
हल्ली ‘आयपीओ’ बूक बिल्डिंग पद्धतीने येत असल्यामुळे प्राईस बॅण्ड दिलेला असतो. एक निश्चित भाव नसतो. अशा वेळी अर्जदाराने ‘कट-ऑफ’ किमतीला निवडणे आवश्यक असते. जर एक ठरावीक किंमत त्याने लिहिली आणि जर तिथे इश्यू किंमत निश्चित झाली नाही तर त्याला शेअरचे वाटप होऊ शकत नाही.

एखाद्या कंपनीचा खूप खोलात जाऊन अभ्यास करायचा झाला तर बराच वेळ आणि प्रावीण्य लागते. ‘आयपीओ’ भांडवली बाजारात आणण्यापूर्वी कंपनीला ‘रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस्‌‍’ प्रकाशित करावे लागते. हे दोन्ही शेअर बाजारांच्या साईटवरदेखील बघता येते. पण प्रॉस्पेक्टस्‌‍ 300-400 पानांचे असते. त्यामुळे प्रत्येकाला ते वाचणे व मुख्य म्हणजे समजणे कठीण असते. या प्रॉस्पेक्टस्‌‍मधल्या पुढील बाबी समजून घ्याव्यात-
जोखीम, आर्थिक माहिती, सर्वसामान्य माहिती, आयपीओ विक्रीस काढण्याची कारणे म्हणजे यातून जमा होणाऱ्या पैशांचे काय केले जाणार, कंपनी ज्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्राची माहिती, कंपनीचा व्यवसाय, व्यवस्थापन, व्यवस्थापन चर्चा व पृथःकरण, चालू असलेले न्यायालयीन खटले व मटेरियल विकास. कंपनी जितक्या खुलेपणाने वरील बाबींची माहिती प्रॉस्पेक्टस्‌‍मध्ये देईल तेवढी तिला जास्त विश्वासार्ह समजण्यात येईल.

जेव्हा ‘आयपीओ’ भांडवली बाजारात येतो तेव्हा याची शेवटची तारीख काय? वाटप कधी होणार याच्या तारखा जाहीर केल्या जातात. ‘आयपीओ’चा जो रजिस्ट्रार आहे त्याच्या संकेतस्थळावर जाऊन ‘ॲलॉटमेंट स्टेटस्‌‍’मध्ये आपला पॅन, डी-मॅट क्रमांक, अर्ज क्रमांक घालून पाहिल्यास आपल्याला शेअर मिळाले अथवा नाही हे पाहता येऊ शकते. कंपन्या ‘आयपीओ’ आणून प्रथम सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडे पोहोचतात, तसेच नव्या गुंतवणूकदारांना अनेकदा ‘आयपीओ’साठी अर्ज करून हळूहळू शेअरबाजारची ओळख करून घेता येते. याचसाठी भांडवली बाजारात ‘आयपीओ’ सतत विक्रीस असणे हे सर्वांसाठी आवश्यक ठरू शकते.
मागच्या दोनतीन वर्षांत अनेक ‘आयपीओ’ आले आणि अनेकांनी लिस्टिंगच्या दिवशी 100 टक्क्यांवर परतावा दिला. साहजिकच ज्यांना या शेअरचे वाटप झाले नाही ते वाटेल त्या किमतीला लिस्टिंगच्या दिवशी शेअर घेण्यास तयार होतात. हा निर्णय चुकीचा ठरून यात फसगत होऊ शकते. लिस्टिंगच्या दिवशी जे चित्र बघायला मिळते ते कंपनीची सत्य परिस्थिती दाखवितेच असे नाही. ‘व्हॅल्यू रिसर्च’ने एक अभ्यास केला त्यानुसार 2010 ते 2017 मध्ये 39 कंपन्यांनी ‘लिस्टिंग’च्या दिवशी 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला. पण घाई न करता एक वर्षाने जर त्याच शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याचा पुढील तीन वर्षांचा परतावा अधिक होता असे आढळून आले. परंतु ‘आयपीओ’ गुंतवणुकीत काय किंवा थेट शेअर बाजार गुंतवणुकीत काय, जर डोळसपणे गुंतवणूक केली तर फार मोठा फायदा होऊ शकतो.