आयपीएल फ्रेंचायझींचे चुकलेले आडाखे

0
319
  • धीरज गंगाराम म्हांबरे

टी-ट्वेंटी हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या गैरहजेरीत आपला खेळ खेळाडूंना दाखवावा लागणार आहे. सातत्य दाखवून संधीचे सोने करतो तोच संघ आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या महासंग्रामाला कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात होणार आहे. शारजा, अबुधाबी व दुबई येथे या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटवेड्या भारतीयांना स्टेडियमवर जाऊन आनंद लुटता येणार नाही. यंदा टीव्हीवर सामने पाहून दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व फ्रेंचायझींनी आपापले होमग्राऊंडस्‌मधील खेेळपट्‌ट्यांचे स्वरुप पाहून खेळाडूंची निवड, संघबांधणी केली होती. परंतु, स्पर्धाच भारताबाहेर गेल्याने त्यांचे आडाखे चुकले आहेत. त्यामुळे रणनीती आखताना यंदा अनेक संघांची पंचाईत होणार आहे. बीसीसीआयने आपले मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्पर्धा भारताबाहेर नेली. अमिरातीमधील वातावरण त्यांना अधिक सुरक्षित वाटले. पण, कोरोनाचा शिरकाव चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होताच बीसीसीआयदेखील धास्तावली आहे. परंतु, आयपीएल तर होणारच. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांच्या बलस्थानांवर व कच्च्या दुव्यांवर नजर टाकून त्यांची स्पर्धेपूर्वीची स्थिती जाणून घेऊया.

चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएलमधील सर्वांत लोकप्रिय फ्रेंचायझींपैकी एक आहे. याला कारणही तसेच आहे. महेंद्रसिंग धोनीच्या रूपात खमका नेता त्यांना लाभला आहे. ‘थाला’ म्हणून चेन्नईच्या चाहत्यांमध्ये त्याचा सन्मान केला जातो. ‘चिन्नथाला’ सुरेश रैनाची साथ मात्र त्याला यंदाच्या मोसमात लाभण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाच्या कारणास्तव स्पर्धेतून अंग काढून घेतल्यानंतर रैनाने अमिरातीमध्ये परत येण्याचे संकेत दिले असले तरी परिस्थिती त्याला कितपत साथ देते यावर सर्वकाही अवलंबून आहे. रैनाच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईची मधली फळी दुबळी बनणार आहे. त्यामुळे ३९ वर्षीय धोनीवर अधिक जबाबदारी येणार आहे. अनुभवी हरभजन सिंग याने अंग काढून घेतल्याने चेन्नईला हा मोठा धक्का आहे. अमिरातीमधील संथ खेळपट्‌ट्यांवर संघात ऑफस्पिनर नसण्याची मोठी किंमत चेन्नईला मोजावी लागू शकते. दीपक चहर व सॅम करन यांच्या रूपात दोन स्विंग गोलंदाज चेन्नईकडे असले तरी अमिरातीच्या उष्ण, कोरड्या वातावरणात त्यांचा कितपत निभाव लागतो हे स्पर्धेदरम्यानच कळेल. फिरकीपटूंचा बोलबाला राहण्याची अधिक शक्यता आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा युवांना अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ प्रदान करणारा म्हणून ओळखला जातो. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेला जलदगती गोलंदाज ऍन्रिक नॉर्के व ऑस्ट्रेलियाचा युवा डॅनियल सॅम्स यांना संघात घेऊन त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे. याचबरोबर फ्रेंचायझीकडे रविचंद्रन अश्‍विनसारखा कसलेला ऑफस्पिनर आहे. पॉवरप्लेमध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी करत बळी घेण्यासोबतच धावा रोखण्याचे काम तो दीर्घकाळापासून करत आला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कुस स्टोइनिस याचे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दणकेबाज प्रदर्शन पाहून दिल्लीचा संघ नक्कीच सुखावला असेल. शिखर धवन, श्रेयस अय्य्यर, ऋषभ पंतसारखे नावाजलेली नावे संघात असली तरी सातत्य ही त्यांची समस्या सुरुवातीपासूनच राहिली आहे. इशांत शर्मा व कगिसो रबाडा हे वेगवान गोलंदाज फिरकी गोलंदाजांच्या दिमतीला आहेत. नव्या चेंडूने किंवा मधल्या षटकांत ही दुकली समाधानकारक कामगिरी करत आलेली असली तरी हाणामारीच्या षटकांत अचूक दिशा व टप्पा राखून गोलंदाजी करणार्‍या जलदगती गोलंदाजाची कमतरता दिल्लीला भासू शकते. या परिस्थितीत त्यांच्याकडून अश्‍विन, लामिछानेसारख्या फिरकी गोलंदाजांचा वापर शक्य आहे.

किंग्स इलेव्हनचा संघ यंदाच्या मोसमात सर्वांत असमतोल भासतो. ख्रिस गेल, लोकेश राहुल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेलसारखे खंदे वीर आघाडी फळीत आहेत. परंतु, केवळ चार विदेशींची असलेली मर्यादा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. मोहम्मद शमी वगळता एकही चांगला भारतीय जलदगती गोलंदाज त्यांच्या ताफ्यात नाही. रविचंद्रन अश्‍विनच्या जाण्यामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी त्यांना भरून काढता आलेली नाही. त्याच्या तोडीचा सोडाच, त्याच्या जवळपास जाणारा एकही फिरकीपटू पंजाबकडे नाही. रवी बिश्‍नोई, मुरुगन अश्‍विन, कृष्णप्पा गौतम या नवोदित फिरकीपटूंच्या जोरावर जर पंजाबचा संघ आयपीएल जिंकण्याची स्वप्ने पाहत असेल तर ते शक्य होणे नाही. त्यासाठी अफगाणी फिरकीपटू मुजीब रहमान याला अधिकाधिक सामन्यांत उतरवावे लागणार आहे. यासाठी एका विदेशी गोलंदाजाचा किंवा अष्टपैलूचा बळी त्यांना द्यावा लागणार आहे. संघ निवडीचे हे किचकट गणित त्यांना सोडवावे लागणार आहे. पंजाबचा संघ तळाला राहणार असे भाकितही अनेक माजी खेळाडूंनी वर्तवले आहे. हे भाकित खोटे ठरवण्याची जबाबदारी पंजाबवर असेल.

कोलकाता नाईट रायडर्स म्हटले की आंद्रे रसेल व सुनील नारायण ही दोन नावे सर्वप्रथम तोंडावर येतात. मॉडर्न युगातील दोन सर्वोत्तम अष्टपैलू केकेआरला लाभले आहेत. नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन लीग स्पर्धेतील बहुतांशी सामन्यांना नारायण मुकला होता. मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला त्रिनबागो नाईट रायडर्सने काही मोजक्याच सामन्यांत त्याला खेळवले होते. त्रिनबागो हा शाहरुख खान याचीच मालकी असलेल्या नाईट रायडर्स फ्रेंचायझीचा भाग आहे. त्यामुळे नारायणची तंदुरुस्ती केकेआरसाठी महत्त्वाची आहे. पीयुष चावला संघात नसल्यामुळे नारायणवरील जबाबदारीत वाढ झाली आहे. यातच नारायण नसल्यास कुलदीप यादवच्या रूपात केवळ एकच दर्जेदार फिरकीपटू केकेआर संघात राहतो. जलदगती विभागात पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन हे विदेशी तर शिवम मावी, कमलेश नागरकोटी हे जलदगती गोलंदाज आहेत. उंचापुरा प्रसिध कृष्णा व सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला संदीप वारियर केकेआरसाठी वरदान ठरू शकतात. वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्यासाठी भिन्नभिन्न शैलीचे खेळाडू संघात असल्यामुळे केकेआरला याचा फायदा अमिरातीमध्ये होऊ शकतो.

मुुंबई इंडियन्सने चेन्नईप्रमाणेच आपले बहुतांशी प्रमुख खेळाडू राखले आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव हे खेळाडू मुंबई संघाशी समरस आहेत. फलंदाजी विभागात प्रत्येक जागेसाठी त्यांच्याकडे एकाहून अधिक पर्याय आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मुंबईने मागील लिलावात काही खेळाडूंची निवड मुंबईतील मध्यमगती गोलंदाजांना मदत करणार्‍या खेळपट्टीला पाहून केली होती. परंतु, स्पर्धा अमिरातीमधील फिरकीला अनुकूल खेळपट्‌ट्यांवर होणार असल्याने त्यांना फिरकीपटूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. राहुल चहर, अनुकूल रॉय, जयंत यादव, कृणाल पंड्या असे काही फिरकी गोलंदाजी करणारे खेळाडू त्यांच्या संघात आहेत. पण, आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये चमक दाखवलेला फिरकीपटू त्यांच्या संघात नाही. डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट मलिंगाने माघार घेतल्यामुळे बुमराहला दुसरा साथीदार शोधण्याचे काम मुंबईला करावे लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पा याला केकेआरकडून घेऊन एक मोठे पाऊल यंदा उचलले. याचे फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे. मयंक मार्कंडे व अंकित राजपूतच्या रूपात विविधता असलेले खेळाडू घेऊन त्यांनी आपला संघ अधिक मजबूत केला आहे. पण, त्यांचा संघ विजयासाठी विदेशी खेळाडूंवर अधिक अवलंबून असल्याचे त्यांच्या रचनेवरून दिसते. जोस बटलर, स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर असे एकहाती सामने जिंकून देणारे एकापेक्षा एक खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहेत. डेव्हिड मिलर व अँडी टाय हे टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आहेतच. गोलंदाजीत राहुल तेवतिया, श्रेयस गोपाळ व मयंक मार्कंडे हे तिघे मनगटी फिरकीपटू आहेत. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर बळी मिळण्याची तसेच फटकेबाजी होण्याची शक्यतादेखील आहे. एखादा चांगला ‘फिंगर स्पिनर’ त्यांच्याकडे असता तर चांगला पर्याय उपलब्ध झाला असता. तरीसुद्धा राजस्थानचा संघ यंदा विजेतेपद मिळविण्याच्या शर्यतीतीत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, हे नाकारता येणार नाही.

बलाढ्य फलंदाजी फळी व कमकुवत गोलंदाजी ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची खासियत राहिली आहे. हीच परंपरा यंदाच्या मोसमातही दिसण्याची शक्यता आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, ऍरोन फिंच हे त्रिकुट कोणत्याही गोलंदाजी फळीला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे असताना आरसीबीची गोलंदाजीची बाजू लंगडी पडताना दिसत आहे. वॉशिंग्टन सुंदर व युजवेंद्र चहलला ऍडम झॅम्पाची साथ लाभणार असल्यामुळे फिरकी विभागात अधिक चिंतेचे कारण नसेल. वेगवान गोलंदाजीत मात्र आरसीबीसमोर डोकेदुखी आहे. डेल स्टेन हा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट नाही. वनडे व कसोटीतील कामगिरीची पुनरावृत्ती त्याला क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारात करता आलेली नाही. उमेश यादव व मोहम्मद सिराज यांच्याविषयी न बोललेलेच बरे. आरसीबीच्या विजयाची शक्यता असताना अनेक लढतींत या दोघांनी धावांची खैरात करत प्रतिस्पर्धी संघाला विजयी केले आहे. त्यामुळे आरसीबीने प्रत्येक लढतीत २०० धावा जरी केल्या तरीसुद्धा वेगवान गोलंदाजांच्या अपयशामुळे पराभूत होण्याचे प्रमाण यावेळीसुद्धा दिसेल.

सनरायझर्स हैदराबादला जॉनी बॅअरस्टोव व डेव्हिड वॉर्नर यांच्या रूपात सर्वांत धोकादायक सलामीवीर लाभले आहेत. या दोघांव्यतिरिक्त केन विल्यमसन व लेगस्पिनर राशिद खान स्पर्धेतील बहुतांशी सामन्यांत खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहम्मद नबी व बिली स्टेनलेक यांना सामावून घेण्यासाठी एखाद्याला बाहेर बसवणे सनरायझर्सला सोपे जाणार नाही. भुवनेश्‍वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा असे वेगवान गोलंदाजीतील विविध पर्याय त्यांच्याकडे आहेत. डावखुरा अनुभवी फिरकीपटू शाहबाज नदीम याच्यामुळे त्यांच्या गोलंदाजी विभागाला अधिक बळकटी मिळते.
देशातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयपीएलचा २००९ साली झालेला मोसम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. त्यानंतर २०१४ साली याच कारणास्तव स्पर्धेतील काही सामने अमिरातीमध्ये झाले होते. आता तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विदेशात आयपीएल होणार असल्यामुळे खेळाडूंचा नक्कीच कस लागणार आहे.