आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवा

0
103

>>मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश: बीसीसीआयला झटका

 
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील जनता पाण्यासाठी तळमळत असल्याने ३० एप्रिलनंतरचे आयपीएलचे सर्व सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिले आहेत. या आदेशामुळे बीसीसीआयला जोरदार तडाखा बसला असून आयपीएलच्या मुंबईतील अंतिम सामन्यासह एप्रिलनंतरचे १३ सामने आता मुंबई व पुण्याबाहेर खेळवावे लागणार आहेत.

सामन्यांच्या आयोजनासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने १५ दिवसांची मुदत आयोजकांना दिली आहे. काल झालेल्या सुनावणीवेळी मुंबई व पुणे संघांच्या मालकांनी मुख्यमंत्री मदत निधीत प्रत्येकी पाच कोटी जमा करण्यास सहमती दर्शवूनही न्यायालयाने वरील आदेश दिले. ‘‘आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवल्याने दुष्काळाचा प्रश्‍न सुटणार नाही. मात्र, सामन्यांसाठी वापरण्यात येणार असलेले पाणी दुष्काळग्रस्त भागांना पुरवठा केल्यास ही समस्या थोड्या प्रमाणात सुटू शकते. न्यायालय दुष्काळग्रस्तांकडे डोळेझाक करू शकत नाही’’ असे न्या. व्ही. एम. कानडे व एम. एस. कर्णिक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना स्वच्छता व इतर दैनंदिन कामांसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे मैदानांवरील खेळपट्‌ट्यांच्या देखभालीसाठी वापरण्यात येणारे प्रक्रिया केलेले पाणी अशा भागांना पुरविले जाऊ शकते असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र क्रिकेट मंडळ व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्वत: पुढाकार घेऊन राज्याबाहेर आयपीएलचे सामने खेळवणे गरज होती. परंतु, दुर्दैवाने त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याचे मत नोंदवत सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्याचे आदेश देण्यावाचून न्यायालयासमोर दुसरा पर्याय नव्हता असे आदेशात म्हटले आहे.
एप्रिलनंतर मुंबई, पुणे व नागपूर येथे आयपीएलचे १३ सामने खेळविले जाणार होते. या सामन्यांत २९ रोजी मुंबई येथे खेळण्यात येणार असलेल्या अंतिम सामन्याचाही समावेश होता. कालच्या सुनावणीवेळी पुणे संघाच्या वकिलांनी त्यांच्या संघाचा पाठिंबा कमी होईल असा दावा करीत सामने पुण्याबाहेर खेळविण्यास विरोध दर्शविला होता. बीसीसीआयने अनेक गुंतवणुकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले असल्याने आयपीएलचे सामने महाराष्ट्रातच खेळवण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहात का, असे बीसीसीआयचे वकील रफिक दादा यांना विचारले असता त्यांनी पाहू असे मोघम उत्तर दिले.