आयपीएलचा बिगुल वाजणार !

0
129

>> बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वर्षीची इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाविषाणूंच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा खेळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे गांगुली यांनी सांगितले आहे.
आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआयशी संलग्न असलेल्या संस्थांना गांगुली यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आयपीएल स्पर्धा खेळविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोरोनामुळे भारतात आत्तापर्यंत ८ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे.

‘बीसीसीआय सर्व पर्यायांची शक्याशक्यता पडताळून पाहत असून रिक्त स्टेडियममध्ये स्पर्धा खेळवावी लागेल तरी याची तयारी आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. चाहते, फ्रेंचायझी, खेळाडू, प्रसारक, पुरस्कर्ते व इतर सर्व भागधारक यंदाच्या स्पर्धेसाठी उत्सुक असल्याचे या पत्रात लिहिण्यात आले आहे. ‘नुकतेच भारतातील व विदेशातील खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी आपली उत्सुकता दाखवली आहे. आम्हाला सुद्धा स्पर्धा खेळवायची आहे. स्पर्धेच्या भवितव्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे भारताच्या या माजी कर्णधाराने सांगितले आहे.

आयसीसीने ऑक्टोबरमधील विश्‍वचषक स्पर्धेचा निर्णय पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. त्यामुळे बीसीसीआय संतापली आहे. आयसीसीने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असता तर नियोजनासाठी बीसीसीआयला अधिक वेळ मिळाला असता.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा अधिक रंगतदार व शक्य होण्यासाठी रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी व विजय हजारे यांचे स्वरुप बदलण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. येत्या दोन आठवड्यांत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल, असे गांगुली यांनी सर्व संलग्न संस्थांना सांगितले आहे. ज्या संस्थांनी आपल्या खर्चाची माहिती दिली त्यांना अनुदान देण्यात आले असल्याची माहितीदेखील गांगुली यांनी दिली.