चार हजार कि. मी.च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत चिनी सैनिकांची जमवाजमव

0
133

भारत-चीन दरम्यान पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनी लष्कराने सुमारे ४००० कि. मी.च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत आपल्या सैनिकांना तैनात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतानेही तातडीने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम व अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये आपल्या सैनिकांची जमवाजमव केली आहे.

भारत-चीन यांच्यात सीमेलगतच्या भूप्रदेशावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. अशातच गेल्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सैनिकांची मोठ्या संख्येने जमवाजमव सुरू केली. काही वेळा भारतीय सैनिक व चीनी सैनिक यांच्यात झटापटीही झाल्या.

चीनी लष्कराने केवळ लडाखमध्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम व अरुणाचल प्रदेश येथील उभयतांच्या सीमा भागांमध्ये सैनिक व शस्त्रसामुग्रीची जमवाजमव केली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर चीनकडून कोणतेही दुःसाहस केले जाण्याआधीच वरील सर्व प्रदेशांच्या सीमा भागांमध्ये भारतीय सैन्याकडून सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिमाचल प्रदेशपासून लडाखपर्यंत लष्कराच्या पायदळाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या हरसील-बाराहोटी – नीलांग खोर्‍याच्या परिसरात लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत. सदर भागात गेल्या एप्रिलमध्ये चीनी लढाऊ विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या होत्या.