हा तर भाजपचा ‘कर दहशतवाद’; काँग्रेसचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र
लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला 1700 कोटींची डिमांड नोटीस पाठवली आहे. याआधी या नोटिसीविरोधातील काँग्रेसची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच सर्वात जुन्या पक्षाची आर्थिक चिंता वाढली आहे.
आयकर विभागाची डिमांड नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षांसाठी असून, त्यात दंड आणि व्याज दोन्हींचा समावेश आहे. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्राप्तिकर विभागाची मागणी नोटीस 2017-18 ते 2020-21 या वर्षासाठी आहे. 1700 कोटी रुपयांच्या रकमेत दंड आणि व्याजाचा समावेश आहे. आयकर विभागाच्या नोटिसीमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने 2017-2021 च्या आयकर विभागाच्या दंडाची पुनर्तपासणी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती; परंतु गुरुवारी न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळली. त्यानंतर काल पक्षाला नोटीस पाठवण्यात आली.
काँग्रेस पक्षाने काल एक पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कर दहशतवाद माजवल्याचा आरोप केला. अशा कारवाईमुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आर्थिकदृष्ट्या पंगू केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्राप्तिकर विभागाच्या नोटिसीवर संताप व्यक्त केला. भाजपा सरकार ईडी, प्राप्तिकर विभाग आणि सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमकुवत करत आहे आणि संविधानाचे महत्त्व कमी करत आहे. तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला नामोहरण करण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा हत्यारासारखा वापर केला जात आहे, असाही आरोप खर्गे यांनी केला. मात्र अशा कारवायांमुळे घाबरून जाऊन काँग्रेस आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे सोडणार नाही. आम्ही पूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि भाजपच्या हुकूमशाहीतून देशाच्या संस्थांना मुक्त करू, असेही खर्गे म्हणाले.
राहुल गांधींचा भाजपला इशारा
प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला 1700 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर काही तासातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. जेव्हा केव्हा भाजपचे सरकार उलथेल तेव्हा ज्यांनी ज्यांनी लोकशाही उद्ध्वस्त करण्यात हातभार लावला त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच राहुल गांधी यांनी दिला. अशा कारवाईमुळे भविष्यात कुणीही लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.