आयआयटी प्रकल्पासाठी नव्या जागेचा अद्याप निर्णय नाही

0
207

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या विरोधातील आंदोलनाला मिळालेल्या वाढत्या पाठिंब्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेळ मेळावलीतून आयआयटी संकुल अन्य ठिकाणी हालविण्याची घोषणा १२ जानेवारीला केली होती. तथापि, आयआयटी संकुलाच्या नवीन जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आयआयटी संकुलासाठी आता कुठली जागा निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयआयटी संकुलाच्या नवीन जागेबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. आयआयटी संकुलासाठी सांगे- कुडचडे, ताळगाव, वेर्णा अशा काही जागा सुचविण्यात येत आहेत. आयआयटीचे संकुल उभारण्यासाठी काणकोण येथे सुरुवातीला जागा निश्‍चित करण्यात आली होती. तथापि, स्थानिकांच्या विरोधामुळे सदर जागा रद्द करण्यात आली. त्यानंतर सांगे तालुक्यात जागेसाठी प्रयत्न करण्यात आला. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शेळ मेळावली येथे आयआयटी संकुलासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. ह्या निर्णयाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात आला. आयआयटी संकुलाच्या नवीन जागेबाबत अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्रा येथे पत्रकारांशी बोलताना काल दिली.