आयआयटी दक्षिण गोव्यातच होणार

0
15

>> मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; नव्या जागेचा शोध सुरू

>> मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; नव्या जागेचा शोध सुरू

आयआयटी प्रकल्प सांगे येथे होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पार्श्वभूमीवर सरकारने आता आयआयटीसाठी नव्या जागेचा शोध सुरू केला असून, नियोजित आयआयटी प्रकल्प हा दक्षिण गोव्यातच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मडगाव रवींद्र भवनात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना आयआयटीसंबंधी विचारले असता मुख्यमंत्र्यानी सदर माहिती दिली. सांगे येथे आयआयटी प्रकल्पासाठी निश्चित केलेली जागा ही सदर प्रकल्पासाठी पुरेशी नसल्याने आयआयटी प्रकल्प तेथे न उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगे येथील जागा ही आयआयटीसाठी अपुरी असून, तेथील जागा ही डोंगराळ भागात असल्याने केंद्र सरकारकडून सदर जागेला मंजुरी मिळाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आयआयटीसाठी सरकारला सुमारे 10 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेची गरज आहे. सांगे येथे असलेल्या 8 लाख चौरस मीटर एवढ्या जागेपैकी काही जागा ही डोंगराळ भागात आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने या जागेला मान्यता दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारने लोलये-काणकोण येथे हा प्रकल्प उभारण्याची तयारी केली असता तेथील लोकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे सरकारने हा प्रकल्प तेथून हलवला होता. त्यानंतर शेळ-मेळावली येथेही आयआयटी प्रकल्पाला विरोध झाला होता. आता सांगे येथेही हा प्रकल्प होऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले असून, त्यामुळे आता आयआयटीसाठी नव्या जागेचा सरकारला शोध घ्यावा लागणार आहे; मात्र हा प्रकल्प दक्षिण गोव्यातच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काल रवींद्र भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातर्गत मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धांतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.