Home Featured ‘आम्ही पणजीकर’ पॅनलमनपा निवडणूक आखाड्यात

‘आम्ही पणजीकर’ पॅनलमनपा निवडणूक आखाड्यात

0

उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलला दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा पाठिंबा

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीच्या दोन माजी महापौरांसह (सुरेंद्र फुर्तादो व वैदेही नाईक) पणजी महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी एका स्वतंत्र पॅनलची स्थापना केली असून, ‘आम्ही पणजीकर’ असे नाव या पॅनलला दिले आहे. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना वरील त्रयींनी पणजी महापालिकेच्या सर्व म्हणजेच तीसही प्रभागांतून आपल्या पॅनलचे उमेदवार उभे करणार असून, आपल्याच पॅनलचा या निवडणुकीत विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राजकीय घराणेशाहीला खतपाणी घालणारे भाजप नेते व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचा पराभव करण्यासाठीच आम्ही ‘आम्ही पणजीकर’ या पॅनलची स्थापना केली आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

स्वत: आमदार असलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला राजकारणात आणून आमदार बनवले. मात्र, एवढ्यावरच न थांबता आपले पुत्र रोहित मोन्सेरात यांना पणजी महापालिका निवडणुकीत उतरवून त्यांना पणजीचा महापौर बनवले. बाबुश मोन्सेरात यांची ही घराणेशाही व एकाधिकारशाही संपवण्याची गरज असून, त्यासाठीच ‘आम्ही पणजीकर’ या पॅनलची स्थापना केली आहे आणि मोन्सेरात यांच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी आपले पॅनल पूर्ण क्षमतेने पणजी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

‘आम्ही पणजीकर’ हे पॅनल कुठल्याही राजकीय पक्षाचे पॅनल नसेल, तर ते पणजीवासीयांचे पॅनल असेल. या पॅनलवर शुध्द चारित्र्याच्या उमेदवारांचीच वर्णी लागणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

बाबूश मोन्सेरात यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत 15 नवे चेहरे देण्याची घोषणा केली आहे, असे सांगून त्या 15 नगरसेवकानी चांगले काम केले नाही असा त्याचा अर्थ होत असल्याचे उत्पल पर्रीकर म्हणाले.

माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो हे यावेळी बोलताना म्हणाले की, उत्पल पर्रीकर, वैदेही नाईक व आपली पणजी महापालिका निवडणुकीत उतरवण्यासाठी पॅनल स्थापन करण्याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू होती. आता त्याला मूर्तरुप मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबूश मोन्सेरात विरुध्दच्या आमच्या पॅनलला अन्य पक्ष पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे आमचे पॅनल व मोन्सरात यांचे पॅनल यामध्ये या निवडणुकीत सरळ लढत होणार असल्याचे ते म्हणाले.
माजी महापौर वैदेही नाईक यांनीही यावेळी बोलताना ‘आम्ही पणजीकर’ पॅनलचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले. माजी नगरसेवक दत्तप्रसाद नाईक व मिनिनो डिक्रूझ यांनीही ‘आम्ही पणजीकर’ या पॅनलला पाठिंबा दिलेला असून, तेही पत्रकार परिषदेला हजर होते.

उमेदवारांबाबत तूर्त गुप्तता
आमच्या ‘आम्ही पणजीकर’ पॅनलचे उमेदवार ठरलेले आहेत; मात्र त्यांची नावे एवढ्यात जाहीर करण्यात येणार नसून, आम्ही उमेदवारांबाबत गुप्तता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काही लोक त्यांच्यावर दबाव आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला. आम्ही योग्य वेळी त्यांची नावे जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

आम्ही पणजीकर’ला काँग्रेस पाठिंबा देणार
उत्पल पर्रीकर यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या ‘आम्ही पणजीकर’ या गटाला काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देणार आहे. काँग्रेसचे नेते सुरेंद्र फुर्तादो या गटाचे नेतृत्व करीत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल स्पष्ट केले.

…तेव्हा रोहित मोन्सेरात यांनी पळ काढला!
मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंच्या प्रश्नावरून भेटायला आलेल्या लोकांना न भेटताच महापौर रोहित मोन्सेरात यांनी पळ काढल्याचा आरोपही उत्पल पर्रीकर यानी केला. पणजी शहराला वाहतूक कोंडी, प्रदूषण व पार्किंग समस्या यासह कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेवर आता चांगल्या लोकांची सत्ता येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.