आमदार वाघ, मडकईकरांचा संपकरी कामगारांना पाठिंबा

0
90

भाजप नेत्यांकडून धमक्यांचा आरोप
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेल्या भरती रोजगार सोसायटीच्या कर्मचारी संघाच्या नेत्यांना भाजप नेते सतीश धोंड धमक्या देत असून त्यांच्या धमक्यांना योग्य ते उत्तर देण्याचा इशारा संघटनेचे नेते अजितसिंग राणे व स्वाती केरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.आमदार मडकईकर, वाघांचा पाठिंबा
आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्यास सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सक्रीय पाठिंबा देण्याचे आश्‍वासन सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ व कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले. काल सकाळी या दोघाही आमदारांनी उपोषणास बसलेल्यांची भेट घेवून आपला पाठिंबा दिला.
धमक्यांमुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता
भाजप नेत्यांकडून धमक्या येत असल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परवा बुधवारी साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी उपोषणास बसलेल्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्यासाठी मन वळविण्याचे प्रयत्न केले होते. परंतु ते अयशस्वी झाले. राज्यातील अन्य कामगार संघटनांचाही या कामगारांना पाठिंबा मिळत आहे. संघटनेचे नेते राणे यांना अलिप्त ठेवल्यास वाटाघाटी करण्याची तयारी भाजप नेत्यांची आहे. परंतु कामगारांची त्यास मान्यता नाही. लेखी आश्‍वासन हवे
मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिले तरच आंदोलन मागे घेण्याची कर्मचार्‍यांची तयारी आहे. वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने बंदर कप्तान कार्यालयाच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरील सोसायटीचे सुमारे १५०० कर्मचारी असून त्यांची सेवेत नियमित करण्याची मागणी आहे. दरम्यान, काल संध्याकाळी कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही आंदोलकांची भेट घेऊन आपला सक्रिय पाठिंबा व्यक्त केला.