आमदार दयानंद सोपटेंवर खासगी इस्पितळात उपचार

0
285

कोरोनाचा संसर्ग झालेले मांद्रेंचे आमदार दयानंद सोपटे यांना काल सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दोनापावला येथील खासगी इस्पितळात भरती करण्यात आले. आमदार सोपटे व सांताक्रुझचे आमदार आंतेनियो फर्नांडिस यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सोमवारी त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पष्ट झाले.

दरम्यान, यापूर्वी बाणावलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, मगो पक्षाचे मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, तसेच प्रियोळचे माजी आमदार दीपक ढवळीकर आदींनी खाजगी इस्पितळात उपचार घेतले होते.

यापूर्वी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी गोमेकॉमध्ये उपचार घेतले. क्लाफासियो डायस यांनीही सरकारी इस्पितळात उपचार घेतले आहेत. दरम्यान, कोविडची कोणतीही लक्षणे नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा पर्याय निवडला आहे. उद्या दि. १७ सप्टेंबरपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. सध्या ते आल्तिनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानावरून कामकाज सांभाळत आहेत.