उपचारार्थ उशिरा येत असल्याने मृत्यू वाढले ः मुख्यमंत्री

0
284

>> कोरोना स्थितीचा ऑनलाइन आढावा

गोव्यात कोरोना रुग्णांसाठी चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे. तरीही, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांना इस्पितळात उशिरा दाखल केले जाते. मात्र इस्पितळात त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले जातात. मात्र तोवर उशीर झालेला असतो त्यामुळे त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. रुग्णांच्या मृत्यूच्या विषयावर चर्चा, शिक्षण, मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. राज्यातील कोरोना सद्यःस्थितीचा ऑनलाइन पद्धतीने आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सचिव, आरोग्य खात्याचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची त्वरित कोविड चाचणी करून योग्य उपचार दिल्यास राज्यातील कोविड मृत्यूचे प्रमाण शून्यावर येऊ शकते. केवळ सरकारी यंत्रणा, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मृत्यूचे प्रमाण कमी करू शकत नाहीत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

बांबोळी येथील इस्पितळात एकाच दिवशी मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आल्याने खाटांच्या कमतरतेमुळे काही रुग्णांना जमिनीवर व्यवस्था करावी लागली. केवळ एकाच दिवशी ही परिस्थिती निर्माण झाली. दुसर्‍या दिवशी उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वसामान्यांसाठी सरकारी
इस्पितळात सोय
राज्यातील खासगी इस्पितळासाठी कोविड उपचारांसाठी शुल्क निश्‍चित करताना सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. खासगी इस्पितळात कोविड उपचारांसाठी भरपूर शुल्क आकारले जाणार असले तरी, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोविड उपचारांसाठी सरकारच्या इस्पितळात सोय उपलब्ध केली जाणार आहे. सरकारी इस्पितळात ऑक्सिजनची कमतरता नाही. सरकारी इस्पितळात केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला.

चाचणीसाठी येणार्‍यांना
परत पाठवू नका
कोविड चाचणीसाठी येणार्‍यांना परत पाठवू नका. आरोग्य खात्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोविड केअर सेंटर आणि होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या संपर्कात राहावे. आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती कोविड चाचणी आणि उपचाराशिवाय राहू नये म्हणून योग्य खबरदारी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीत केल्या आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत दोन दिवसांत चर्चा
राज्यातील विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत येत्या दोन दिवसात संबंधितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. राज्यात विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत २० सप्टेंबरनंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे. सरकारकडून विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही. पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, विद्यालय व्यवस्थापन व इतर संबंधितांशी चर्चा केल्यानंतर विद्यालयांचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.