आमदार अपात्रता याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

0
265

सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. तथापि, या अपात्रता याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती अर्जाद्वारे दोघा प्रतिवादींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे या याचिकेवरील नियोजित सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या याचिकेतील प्रतिवादी क्रमांक १ गोवा विधानसभा सभापतींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. या याचिकेबाबत आणखीन माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करायची आहे. त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेतील एक प्रतिवादी आमदार क्लाफासियो डायस हे आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर, आणखीन एक प्रतिवादी नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्यावतीने एक अर्ज सादर करून सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यात आमदार डिसा हे कोविडवर उपचार घेत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. अपात्रता याचिका प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रतिवादींकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप कॉँग्रेसकडून केला जात आहे.