पुन्हा राज्यभर मुसळधार

0
204

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पणजी शहरात काल सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत सुमारे १.३७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राजधानी पणजीसह पेडणे, म्हापसा, डिचोली, सत्तरी, फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण, ओल्ड गोवा, मडगाव आदी परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
राज्यात आत्तापर्यंत १०८.९२ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा २३ टक्के जास्त आहे. राज्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे राज्यभरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

राज्यात मागील चार दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पावसाच्या प्रमाणात काल पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली होती. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील चोवीस तासांपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील विविध भागात पडणार्‍या जोरदार पावसामुळे नद्या, नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी यंत्रणा राज्यभरात कोसळणार्‍या पावसामुळे सतर्क झाली आहे.