कुठल्याही समविचारी विरोधी पक्षाशी युती न करता येऊ घातलेली गोवा विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेल्या आम आदमी पक्षाने या निवडणुकीसाठीच्या आपल्या पहिल्या दहा उमेदवारांच्या नावाची यादी काल जाहीर केली. कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा व शिरोड्याचे माजी आमदार महादेव नाईक यांचा समावेश असलेली ही यादी जाहीर झाली.
यात सांताक्रुझ मतदारसंघातून अमित पालेकर, पर्ये मतदारसंघात विश्वजीत कृष्णराव राणे, वाळपई मतदारसंघात सत्यविजय नाईक, दाबोळी मतदारसंघात बाबू नानोस्कर, बाणावलीत व्हेन्झी व्हिएगस, नावेली मतदारसंघात प्रतिमा कुतिन्हो, सांगे मतदारसंघात अभिजीत देसाई, कुडतरी मतदारसंघात डॉम्निक गांवकर तर शिरोडा मतदारसंघात महादेव नाईक व कुठ्ठाळीतून एलिना साल्ढाणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आम आदमी पक्ष राज्यातील चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाने यापूर्वी केलेली आहे.