>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत शपथपत्रावर केल्या स्वाक्षर्या
आम आदमी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील ३९ उमेदवारांनी आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही आणि प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याची शपथ काल घेतली. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर यांनी सर्व उमेदवारांना शपथ दिली.
राज्यात कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ यापूर्वी घेतली आहे. त्यानंतर आता आपच्या उमेदवारांनी पक्षांतर न करण्याची एका शपथपत्रावर स्वाक्षरी करून शपथ घेतली आहे.
गोव्यातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी आम्ही निवडणुकीसाठी प्रामाणिक उमेदवारांची निवड केली आली आहे. राज्यातील मतदारांनी कॉंग्रेस आणि भाजपला सरकार चालविण्याची संधी दिली. त्यांना राज्याचा अपेक्षित विकास करण्यात यश प्राप्त झाले नाही. भाजपच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे आपला राज्य चालविण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले. कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांना देवालये आणि चर्चमध्ये नेऊन शपथ दिली. तथापि, जनता हीच खरे तर देव आहे. त्यामुळेच आपने जनतेसमोर उमेदवारांना शपथ दिली आहे. उमेदवारांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केली आहे. या शपथपत्राच्या छायांकित प्रती मतदारांना दिल्या जाणार आहेत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
आपच्या एखाद्या विजयी उमेदवाराने पक्षांतर केल्यास या शपथपत्राच्या आधारे मतदार त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात. पक्षांतराच्या राजकारणामुळे जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी शपथपत्राद्वारे आपच्या उमेदवारांना शपथ घेण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल,
राष्ट्रीय समन्वयक, आप.