आपचे आमदार सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर

0
2

आम आदमी पक्षाचे नेते तथा आमदार सत्येंद्र जैन यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. तब्बल 18 महिन्यानंतर ते तुरुंगांतून बाहेर आले. न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला असून, यादरम्यान देश सोडून जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. हा खटला लवकर संपण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नोंदवले. सत्येंद्र जैन यांना 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून करण्यात आली होती.

काल रात्री 8.16 च्या सुमारास सत्येंद्र जैन हे तिहारमधून बाहेर त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह आणि इतर आप कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर त्यांचे स्वागत केले.

महत्त्वाचे म्हणजे सत्येंद्र जैन यांना गेल्या वर्षी मे महिन्यात प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने त्यांना पुन्हा आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर काल सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी संपायला अजून बराच कालावधी लागेल, तोपर्यंत सत्येंद्र जैन यांना तुरुंगात ठेवता येणार नाही. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करत आहोत, असे न्यायालयाने नमूद केले.

सत्येंद्र जैन यांच्यावर काय आरोप?
सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदावर असताना काही कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामध्ये 4 कोटी 81 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाशी संबंधित तब्बल 4.81 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती.