भारतीय दंड संहितेतील कलम ३०९ रद्द करण्यासाठी देशातील १८ राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेश राजी असल्याने हे कलम आता भा. दं. सं. (आयपीसी)मधून हटविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून पहावे आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ती बाब हटविण्यात यायला हवी अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी गेल्या ऑगस्टमध्ये लोकसभेत दिली होती.