‘आत्महत्या’ हा पर्याय नव्हेच!

0
149
  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

आपले व इतरांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शक्य होईल तेवढे जपायचे आहे. आणि हो, हे फक्त आत्तापुरतेच करायचे असा याचा अर्थ नव्हे. आता या गोष्टी करायच्या आहेतच, नंतर आपल्यालाच या चांगल्या गोष्टींची सवय होऊन जाईल.

काल-परवाचीच गोष्ट. अभिनेता कै. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने सम्पूर्ण विश्वाला हादरवून टाकले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव व त्यामुळे आलेल्या नैराश्यामुळे त्याने हे कठोर पाऊल उचलले असावे… असे कित्येक तर्कवितर्क व कयास लावले जात आहेत. पण नक्की खरे काय किंवा खोटे काय हे कोणास ठाऊक? आत्महत्या की अजून काही हे पोलीस, प्रशासन व सम्बन्धित यंत्रणा तपास करतच आहेत व नक्कीच लवकरात लवकर याचा योग्य सोक्षमोक्ष लावून आपल्यासमोर पुराव्यासहित सादर करतीलच अशी अपेक्षा तरी करू. तोपर्यंत आपण तरी आपल्याला जे माहीत नाही ते उगाचच पसरवू नये.

कुतूहल सगळ्यांनाच आहे की नक्की काय घडले असावे.. कारण तो एकतर चांगला, उत्तम अभिनेता होता, माणूस म्हणूनसुद्धा ‘डाऊन टु अर्थ’, इतरांच्या मदतीला धावणारा, आपल्यातलाच एक वाटायचा, स्वतःच्या मेहनतीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला, कोणाच्याही- कुठल्याही वशिल्याच्या आणि मदतीशिवाय. आणि त्याचा असा अकस्मात व अस्वाभाविक मृत्यू होणे कोणाच्या जिव्हारी लागणार नाही? नाहीतरी आपल्याला पण गॉसीपिंगसाठी विषय मिळालाच आहे. छंद असतो ना तो कित्येकांचा? करणार तरी काय ह्या लॉकडाऊन मध्ये अजून? रोज रोज कोरोनाबद्दल बोलून वैतागच तर आलेला. हो की नाही? आणि आता तर सुशांतच्या मृत्यूनंतर आपणसुद्धा सगळ्यांना त्याच नजरेने पाहू लागलोय. मानसिक स्वास्थ्याचे सगळ्यांना उपदेश व धडे देत फिरतोय. ‘टॉक टु मी इफ युव हॅव एनी प्रॉब्लेम’, असे काही दिवस तरी सांगत फिरणार. आपल्यातला माणूस काही दिवसांकरिता का होईना पण जागा झाला आहे. काही काळ लोटला की परिस्थिती जशी होती तशीच पुनः चालू होईल हे पण सत्य आहे. सुशांतच्या मृत्यूचे दुःख सर्वानाच आहे पण फक्त ‘हाय प्रोफाईल’ केस होती म्हणून आपण अतिसामान्य महत्त्व देतो आहे का? सुशांतने जर आत्महत्या केली असेल तर ते साफ चुकीचे आहे. स्वतःला संपवतेवेळी त्याची काय मनःस्थिती असेल हे त्याचे त्याला ठाऊक. त्यावेळी त्याला तेच बरोबर वाटले असेल.

आपण याचा विचारसुद्धा करू शकत नाही. स्वतःचे जीवन संपवण्यासाठीसुद्धा धाडस लागते व ते कोणीही करू नये अशीच मनापासून विनंती. जर तो नैराश्याचा बळी असेल तर असे कित्येक लोक रोज आत्महत्या करत आहेत. त्यांचे काय? त्यांचा कोण विचार करतो? कितीतरीवेळा त्यांची बातमीसुद्धा कुठे नसते. ती दाबून ठेवली जाते. तुमच्या जीवनात काहीही समस्या, ताणतणाव असतील.. पण ते संपवण्याकरिता, त्यांचा निकाल लावण्यासाठी आत्महत्या हा पर्याय कधीच असू शकत नाही. तुम्ही फक्त तुमचे जीवन संपवता व मोकळे होता. पण तुमच्याशी जोडलेली जी माणसं आहेत त्यांचा कोण विचार करणार? तुमच्याशिवाय त्यांचे आयुष्य कसे असेल? तुमच्या जाण्याने त्यांना किती दुःख होईल याचा विचार नक्कीच केला पाहिजे असे नाही का वाटत?
जगात जवळपास ८ लाख लोक दरवर्षी आत्महत्येतून मरण पावताहेत. नैराश्यातून, असफल प्रेमप्रकरणातून, धंद्यातील नुकसान सहन न करू शकल्यामुळे (शेतकरी हे जास्त प्रमाणात), पारिवारीक भांडणातून, घरच्यांकडून एखादी मागितलेली गोष्टी न मिळाल्यामुळे, शालेय किंवा पात्रता परीक्षेमध्ये नापास झाल्याने, आजारातून म्हातारपणातून कंटाळल्याने, अनैतिक संबंधातून, गुन्हेगारीमुळे, व्यसनाच्या अभावी/ न मिळाल्याने अशी कित्येक कारणे सापडतील. आणि आता तर कोविड-१९ ह्या महामारीमुळे बरेचशे व्यवसाय बंद झाले आहेत व आर्थिक नुकसान झाल्याने जगणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे.

पण एवढे मात्र लक्षात ठेवायलाच हवे की परिस्थिती ही बदलत असते. आज जे वाईट दिवस आहेत ते उद्या नसतीलही. म्हणून आपण काही जगणे सोडून द्यायचे नसते. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. जर सगळ्याच गोष्टी चांगल्याच व आपल्या मनाप्रमाणेच घडत राहिल्या तर त्यांची किंमत आपल्याला नसते. प्रत्येक वाईट दिवस, गोष्ट आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाते. आपल्या अस्तित्वाची, आपल्या चुकांची जाणीव देऊन जाते. आपल्याला काय करायला हवे होते आणि काय नाही हे शिकवते. अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे सर्वानाच दु:ख आहे पण त्याचा मृत्यूसुद्धा आपल्याला काही तरी शिकवून गेला की जर ह्या गोष्टी वेळेत सांभाळल्या गेल्या असत्या, बोलल्या गेल्या असत्या तर कदाचित तो माणूसही आज आपल्यामध्ये असता. बिघडलेल्या गोष्टी ह्या समजून व समजावून सोडवता येतात. त्यासाठी टोकाची भूमिका कधीच घेऊ नये जेणेकरून आपल्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल किंवा जिवाचे काही बरेवाईट होईल. ह्या कोरोनामुळे २०२० जर तुम्हाला शापीत आणि नुकसानीचे वाटत असेल, तर ह्याचेसुद्धा भान ठेवा की आजची जी अवस्था, परिस्थिती आहे ती जास्त दिवस टिकणार नाही. आपण परिस्थितीला आत्मसमर्पण नाही करायचे आहे. लढा द्यायचा आहे. हार नाही मानायची. पैसा कमवण्यासाठी धडपडू नका. जिवंत राहिलो तर तोपण नंतर दुपटीने कमवू शकतो आपण. स्वस्थ राहून आपले व इतरांचे प्राण वाचवायचे आहेत. आपले व इतरांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शक्य होईल तेवढे जपायचे आहे. आणि हो, हे फक्त आत्तापुरतेच करायचे असा याचा अर्थ नव्हे. आता या गोष्टी करायच्या आहेतच, नंतर आपल्यालाच या चांगल्या गोष्टींची सवय होऊन जाईल.

ह्या कोवीड़-१९ मुळे लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी वाईट नाही घडल्या आहेत. काही सकारात्मक बदलसुद्धा झाले आहेतच की. माणसे एकमेकांच्या जवळ आली आहेत. ज्यांना एकमेकांसाठी वेळ नव्हता त्यांच्यामध्ये आता संवाद होऊ लागले आहेत (भांडणसुद्धा होत आहेत पण तुम्ही किती मॅच्युअर आहात भांडणे टाळण्यासाठी व सोडविण्यासाठी हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे). परिस्थितीशी जुळवून घ्या. पळ काढून काहीही होणार नाही. उलट त्या अजूनच चिघळतील, बिघडतील. त्यांना सामोरे जा. पाठ फिरवू नका. ह्याचा अर्थ असा घेऊ नये की भांडण करा. पण त्या सोडविण्याचा प्रयत्नतरी करून पहा. यातच आपली मानसिक कणखरता सिद्ध होईल.
आपण कित्येक वेळा कळत नकळत आपल्या शब्दांतून, कृतींतून समोरच्याला दुखवतो, त्यांची अवहेलना, अनादर करतो, त्यांचा तिरस्कार करतो, त्यांच्यावर खोटे आळ घालतो, त्यांना टोमणे मारतो, घालुनपाडून बोलतो, अपमानास्पद वागणूक देतो, चारचौघांत त्यांची लाज काढतो, त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवितो. अशा इतरही बर्‍याचशा असतील. असे करणे थांबवावे. कारण ती समोरची व्यक्ती या सर्व गोष्टी किती खेळाडुवृत्तीने घेईल हे आपल्याला माहीत नसते. जर तसे नसेल होत किंवा ती व्यक्ती हळव्या मनाची जर असेल तर मात्र ह्याचे परिणाम भयानक होऊ शकतात. ती व्यक्ती ताणतणाव, डीप्रेशनमध्ये जाऊ शकते आणि ह्याचेच रूपांतर आत्महत्येमध्ये होते. आत्महत्येपूर्वी माणसाला कसलेच भान उरत नसते. कोणताही विचार करण्याच्या पलीकडे गेलेली असतात ही लोक. त्यांना फक्त या सर्वांतून मुक्ती हवी असते, पण मार्ग मात्र चुकीचा असतो. असे न करण्याची व सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याची, राहण्याची, दुसर्‍याना न दुखवण्याची सर्वानीच जर सवय करून घेतली तर किती चांगले होईल? नाही का? असे झाल्यास आत्महत्येचे प्रमाण कितीतरी पटींनी कमी होईल. म्हणूनच इतरांना समजून घ्या, त्यांच्याशी वेळेत बोला, त्यांच्या तक्रारींविषयी जाणा, ते सोडविण्यासाठी त्यांना हातभार लावा, त्यांना एकटे सोडू नका, त्यांना एकटेपणा जाणवू देऊ नका.हे आईवडील-मुले, शिक्षक-विद्यार्थी, मालक-कामगार, मित्रमंडळी, नवरा-बायको, भाऊ-बहीण इ. ह्या सर्व नात्यांना लागू आहे. ही सर्व नाती जपा. कारण त्रास सगळ्यांनाच होईल जो मानसिकच जास्त प्रमाणात असतो.